मान्सून लवकर येणे आणि चार महिन्यांमध्ये पाऊस होणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. मान्सून लवकर किंवा उशिरा आला काय, त्याचा पावसावर काहीही परिणाम होत नाही; कारण ७० टक्के मान्सून हा जुलै-ऑगस्टमध्येच पडतो.
जूनमधला मान्सून हा कमी-जास्त झाला तरी चालतो. मात्र, मुळातच मान्सून सात दिवस आधी येणे हे अगदी सामान्य आहे. त्यात वेगळे काहीच नाही.
फरक फक्त इतकाच होतो की, मान्सून लवकर आला की शेतकरी लगेचच पेरण्या करतात. मग खंड पडतो. त्यामुळे काहीसे नुकसान होण्याची शक्यता असते. पण असे होईलच असे नाही, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
तर दुबार पेरण्या !
• दरवर्षी नैर्ऋत्य मान्सून ३१ मे ते १ जूनच्या आसपास केरळमध्ये येऊन धडकतो. यंदा आठवडाभर आधीच केरळामध्ये मान्सून दाखल झाला आहे. यापूर्वी २००९ मध्ये केरळमध्ये लवकर आला होता.
• मात्र त्या वर्षी पावसाचे प्रमाण होते असे म्हटले जाते. पावसाचा खंड पडला तर मग दुबार पेरण्या कराव्या लागतात, याकडे डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
मान्सूनचे गणित नसते
• भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले, मान्सून केरळमध्ये लवकर आला तरी तो राजस्थानमध्ये लवकर येईल, असे मान्सूनचे कोणतेही गणित ठरलेले नसते. त्यामुळे मान्सून लवकर आला तरी ते साजरे करू नये किंवा उशिरा आला तरी चिंता करू नये.
• अनेक वेळा असे झाले आहे की, केरळमध्ये तो लवकर आलेला आहे. तरी मान्सून महाराष्ट्रात यायला १० ते १२ दिवस लागले आहेत. मान्सूनने केरळ व्यापला असला तरी मान्सून लहरी आहे. तो सर्व गोष्टी करण्यास स्वतंत्र आहे. मान्सून आठवडा आधी आलेला असला तरी यात नवीन काहीच नाही. यंदाचा मान्सून चांगलाच राहणार आहे.