सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. उच्चांकी तापमान नोंदले जात आहे. अशावेळी सरत्या पावसाळ्यात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे तलावांमध्ये पाणी टिकले गेले. यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला आणि बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांमधून यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
आज सोलापूर जिल्हातील ७ मध्यम तलावांत ४.२५ टीएमसी, तर ३३ लघु तलावांत २९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वाधिक १.३८ टीएमसी पाणी तळेहिप्परगा तलावात असल्याचे पाटबंधारे कार्यालयाकडून सांगण्यात आले. यंदा जिल्ह्यात जानेवारीपासून उन्हाळ्याचे चटके बसत असले, तरी अधून-मधून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी लहान-मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत.
याचा परिणाम तलावातील पाणीसाठा वाढण्यासाठी होत नसला, तरी पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे. त्यामुळे तलावातील पाणी टिकून राहिले आहे. मे महिन्याच्या अखेरला यातील बरेच तलाव तळपातळी गाठणार असले, तरी लगतच्या विहिरी व बोअरला पाणी टिकून राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच सातही मध्यम तलावांत पाणीसाठा उपलब्ध असून, यापैकी तळेहिप्परगा (एकरुख) तलावात १.३८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. इतरही मध्यम तलावांत पाणी उपलब्ध शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यातील ५६ लघु तलावांपैकी ३३ तलावांत कमी-अधिक प्रमाणात पाणी असल्याचे सांगण्यात आले.
लघु तलावांतील स्थिती
जिल्हात ५६ लघु तलावांपैकी निमगाव (माढा) तलाव मे महिन्यात पूर्ण क्षमतेने भरला आहे. होटगी (दक्षिण सोलापूर) ५५ टक्के, तर बीबीदारफळ (उत्तर सोलापूर) तलावात साधारण ४६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे.
तळसंगी नवा, घेरडी प्रत्येकी ३८ टक्के, रामपूर (दक्षिण सोलापूर) ३४ टक्के, पाथरी (बार्शी) ३० टक्के, वैराग व धुबधुबी प्रत्येकी २८ टक्के, पोरांवर व सोरेगाव प्रत्येकी २६ टक्के, हणमगाव, कोरेगाव, तळसंगी जुना प्रत्येकी २२ टक्के, तर इतर तलावात २० टक्क्यांच्या आत पाणीसाठा आहे.
सात मध्यम तलावांतील पाणीसाठा
| नाव | पाणीसाठा (द.ल.घ.मी.) | टीएमसी | टक्के |
| एकरुख | ३९.२१ | १.३८ | ६४ |
| हिंगणी पा. | २५.६९ | ०.९१ | ३८ |
| जवळगाव | १५.२९ | ०.५४ | ३२ |
| मांगी | १२.८० | ०.४५ | ४१ |
| आष्टी | १४.१६ | ०.५० | ६२ |
| बोरी | ९.५३ | ०.३४ | २८ |
| पिंपळगाव ढाळे | ३.६० | ०.१३ | ८ |
| एकूण | १२०.२४ | ४.२५ | ४५.२२ |
मागील वर्षापेक्षा यंदा अधिक पाणी
मागील पेक्षा या वर्षी तलावातील पाणी पातळी अधिक असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी सात मध्यम तलावात ८६ दलघमी म्हणजे ३.०४ टी एमसी, २९ टक्के तर ५६ पैकी १५ लघू तलावात ११ दलघमी साडेसहा टक्के इतका पाणी साठा होता.
एकरुख मध्यम तलावात सर्वाधिक १.१५ टी एमसी ५२ टक्के, बीबीदारफळ, होटगी लघु तलावात सर्वाधिक प्रत्येकी ३९ टक्के, पाथरी व कोरेगाव प्रत्येकी २७ टक्के इतकी पाणी साठा होता.
हेही वाचा : कोणती फळे, कधी आणि किती खावीत? तसेच काय काळजी घ्याल; जाणून घ्या सविस्तर
