दौंड येथील विसर्गात घट झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट करण्यात आली होती. मात्र, उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने शनिवारी सायंकाळी ७ वाजता १५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी १ हजार ५०० क्युसेक भीमेत सुरू होता. १९ ऑगस्टपासून उजनी धरणातून भीमेत सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त प्रमाणात कायम आहे.
दौंड येथून ३ हजार ७८१ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून दौंड येथून विसर्ग कायम असल्याने उजनीतून भीमा नदीतील विसर्ग कायम राहिला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सून सुरू झाला असून, यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उजनीतून १५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाऊस आणखी वाढल्यास भीमा नदीत पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठचा गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, १०८. ३१ टक्के पाणी पातळी झाली आहे. तर, १२१. ६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ५८.०२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
सध्या धरणातून वीज निर्मिती १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा ६०० क्युसेक, भीमा सीना जोड कालवा २०० क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजना १८० क्युसेक, दहिगाव ४० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. १ जूनपासून धरण परिसरात ४०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
२०२० सारखी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून प्रशासन खबरदार
२०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी उजनीचा अंदाज न आल्याने उजनीतून अचानक २ लाख ५० हजार क्युसेकने पाणी सोडावे लागले होते. यामुळे पंढरपूर येथे अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठचा नागरिकांचे हाल झाले होते. सध्या सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पूर नियंत्रण कक्ष खबरदारी घेत आहे.