मोहन डावरे
पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या मजल-दरमजल करीत पंढरीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात आषाढीचा माहोल तयार झाला आहे.
वारकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट भाविकांना स्नान करण्यासाठी मोकले असणे, तसेच स्नानासाठी जेमतेम पुंडलिक मंदिराच्या पायरीलगत पाणी असणे आवश्यक आहे.
मात्र, सध्या चंद्रभागेत वीर व उजनी धरणांतून २१ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे.
तर वाळवंट केवळ वीस टक्केच मोकळे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष हे भीमा नदीकडे आहे.
उजनी व वीर धरणांमधून सोडण्यात येत असलेल्या विसर्गामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पाणीपातळी राखणे प्रशासनासमोर नियोजनात्मक आव्हान आहे.
यासाठीच गेल्या काही दिवसांपासून सतत पाणी सोडून धरणांमध्ये जागा रिकामी करून घेण्यात आली आहे. सध्या उजनीतून १६ हजार ६०० हजार, तर वीर धरणातून ५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
वीरमधून निरा नदीत सोडलेले पाणी नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीत मिसळते. यामुळे नदीची पाणीपातळी वाढत असते. मंगळवारी दुपारी नृसिंहपूर येथे नदीचा विसर्ग हा २१ हजार क्युसेक इतका होता. तर पंढरपूर येथे भीमा नदी ११ हजार क्युसेकने वाहत आहे.
धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.
दोन दिवसांत विसर्ग कमी होणार
पालखी सोहळे शहरानजीक आल्यावर पंढरीत मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. येथे येणारे भक्त हे पहिल्यांदा चंद्रभागा स्नानास प्राधान्य देतात. हे पाहता नदीची पाणीपातळी ही वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी कमी असणेच योग्य ठरणार आहे. या स्थितीवर पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे लक्ष ठेवून आहेत. दोन दिवसांत विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांत झाला किती पाणीसाठा?