उजनीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याने दौंड येथील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. दौंड येथून शनिवारी सायंकाळी २६,००० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडून १५ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने उजनी पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.
उजनी धरणाची क्षमता १११ टक्के असून सध्या उजनी ९५. ५९ टक्केवरती पाणी पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे. सध्या वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा १ हजार १०० क्युसेक, भीमा सीना जोड कालवा ४०० क्युसेक, सीना माढा १८० तर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
दहा धरणांत १०० टक्के पाणीसाठा
जुलैअखेर उजनीवरील आंध, कळमोडी, विसापूर, तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर कासारसाई, चासकमान, घोड ९१ टक्के भरली आहेत. तर १० धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत. खडकवासला धरणाची पाणी पातळी ५७. ४७ टक्के आहे. नीरा खोऱ्यातील नाजरे धरण शंभर टक्के भरले आहे. वीर, भाटघर, गुंजवणी, नीरा देवघर पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी