गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी (दि.२३) झालेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील बेवारटोला लघू प्रकल्प ९३.४६ टक्के भरला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास हा प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास दमदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या २४ तासात जिल्ह्यात २३.३ मिमी पावसाची नोंद झाली. देवरी आणि सडक अर्जुनी तालुका वगळता इतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. तर, बुधवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
पावसामुळे केलेल्या रोवणीला संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हवामान विभागाने २४ आणि २५ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. पावसाच्या हजेरी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी