सत्ता आणि अधिकार जेव्हा लोकहितासाठी वापरले जातात, तेव्हा त्याचे रूपांतर एका लोकचळवळीत होते. आज धुळे शहराचा पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो, तेव्हा २००५-०६ चा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. धुळेकर पाण्यासाठी दाहीदिशा भटकत होते, कंठ कोरडे पडले होते.
पण, राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयाने धुळे शहराच्या पाच लाख जनतेची तहान भागली. धुळेकर नागरिक, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि माजी सभापती अनिल मुंदडा यांनी या ऐतिहासिक प्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला.
९ महिन्यांत उभे राहिले शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या हरण्यामाळ धरणाचे स्वप्न
• केवळ निधी देऊन अजित पवार थांबले नाहीत, तर त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय गतीमुळे 'हरण्यामाळ' धरणाचे काम अवघ्या ९ महिन्यांत पूर्ण झाले. त्यामुळे धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
• नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती त्यामुळे थांबली. ही आठवण धुळेकरांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.
• धुळे जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रासाठी आणि विशेषतः शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अजित पवार यांनी घेतलेला तो निर्णय आज धुळेकरांच्या आयुष्यातील 'वरदान' ठरला आहे.
जेव्हा 'हरण्यामाळ'साठी दादांनी शब्द टाकला...
• त्या काळात धुळे शहराचा पाणीप्रश्न अत्यंत गंभीर वळणावर होता. मुंबईत मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला तत्कालीन मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार द. वा. पाटील यांची उपस्थिती होती. पाटबंधारे विभागाकडे ४५ कोटींचा निधी उपलब्ध होता.
• बैठकीत वाडीशेवाडी आणि इतर प्रकल्पांसाठी निधीची मागणी होत असतानाच, शहराचे तत्कालीन आमदार राजवर्धन कदमबांडे आणि मनपा स्थायी समिती सभापती अनिल मुंदडा यांनी वस्तुस्थिती मांडली. 'दादा, शहराची लोकसंख्या ५ लाखांवर आहे, नकाणे तलावाची क्षमता संपत आली आहे. जर 'हरण्यामाळ' धरणाला १५ कोटी मिळाले, तर अवघ्या वर्षभरात धुळेकरांची तहान भागेल," अशी विनंती त्यांनी केली.
• अडचणीचे गांभीर्य ओळखून अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला. दादा म्हणाले, "अक्कलपाड्याला मी निधी कमी पडू देणार नाही, वाडीशेवाडीला १५ कोटी देतोय, पण उर्वरित १५ कोटी हे हरण्यामाळ धरणासाठीच दिले जातील. कारण महाराष्ट्र शासनाचे पहिले प्राधान्य हे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हेच आहे!"
• धुळे शहरातील महापालिकेच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्यात आल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लागणारा १५ कोटीचा निधी देखील अजित पवार यांनी मिळवून दिला. याशिवाय शहरातील रस्ते कामासाठी देखील निधी उपलब्ध करुन दिला.
• धुळेकर नागरिकांच्या मदतीला नेहमीच अजित दादा धावून आले होते. त्यामुळे बुधवारी त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त झळकताच धुळेकरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
