गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. परिणामी, विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच १७ दरवाजे उघडून गोदावरीत विसर्ग करण्यात येत आहे.
रविवारी दुपारपर्यंत ३ लाख ९ हजार १७४ क्युसेक वेगाने गोदावरीतपाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे गोदावरी इशारा पातळीच्या वर वाहत होती. परिणामी, नदीकिनारी असलेल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने संसार वाहून गेले होते. अद्यापही या वस्त्यांमधील पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे नागरिकांना निवारा केंद्रात आसरा घ्यावा लागला.
यंदाच्या पुराने नांदेडकरांना २००६ ची आठवण करून दिली. त्यावेळी गोदावरीला पूर आल्याने वजिराबाद भागापर्यंत पाणी शिरले होते, तसेच नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये दहा ते पंधरा फूट पाणी आले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर यंदा नांदेडमध्ये तशीच परिस्थिती ओढवली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते.
रात्रीच्या वेळी १७ वा दरवाजा उघडून विसर्ग करण्यात आला. गोदावरी नदीवरील जुन्या पुलाची इशारा पातळी ही ३५१ मीटर आहे. ती शनिवारीच पार करण्यात आली होती, तर ३५४ मीटरची धोका पातळी ओलांडली होती. त्यामुळे खडकपुरा, दुल्हेशाह रहमाननगर, जी.एम. कॉलनी, गाडीपुरा, काला पूल परिसर, गंगाचाळ, भीमघाट, देगावचाळ, मल्ली परिसर, बिलालनगर, पाकिजानगर, शंकरनगर, वसरणी, श्रावस्तीनगर आदी वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते.
त्यामुळे या भागातील नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. रविवारीही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला होता. त्यात विष्णुपुरीच्या वरच्या भागातूनही येवा सुरूच होता. परिणामी, सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पावसापासून उसंत मिळत नसल्याने नांदेडकरांच्या अडचणीत मात्र वाढच होत आहे.
१३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद
• रविवारी सकाळी ०८:०० वाजेपर्यंत जिल्ह्यातील १३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
• त्यात कंधार, फुलवळ, उस्माननगर, लोहा, माळाकोळी, सोनखेड, कलंबर, तळणी, निवधा, मनाठा, पिंपरखेड, मांडवा आणि वानोळा या मंडळांचा समावेश आहे.
• त्यात सर्वाधिक १३८ मि.मी. पाऊस हा पिंपरखेड मंडळात झाला होता. सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे.
...या प्रकल्पांतून विसर्ग
विष्णुपुरीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून २ लाख ७ हजार ५०४ क्युसेक, खडकपूर्णा ९२ हजार ९७४, माजलगाव ३४ हजार ७४३, यलदरी ४४ हजार ७५०, सिद्धेश्वर ५३ हजार १३९, ऊर्ध्व पैनगंगा २२ हजार ६२, निजामसागर १ लाख ४० हजार २३६, श्रीरामसागर पोचमपाड ४ लाख ५९ हजार ४६३, ऊर्ध्व मानार १ हजार ३२८, निम्न मानार ३ हजार ८०१ आणि निम्न दुधना प्रकल्पातून १० हजार ७२० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.