मेहरून नाकाडे
रत्नागिरी : शिक्षणानंतर व्यवसाय सुरू केला; मात्र शेतीची आवड असल्याने कुडावळे वाघजाईवाडी येथील दर्शन दीपक रहाटे यांनी व्यवसायाला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
निव्वळ खरीप हंगामात पावसावर शेती न करता बारमाही शेती करीत आहेत. शासनाच्या 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीचे तंत्र दर्शन यांनी अवलंबले आहे. दर्शन यांचे आई-वडील शेती करीत असल्यामुळे त्यांना शेतीचे बाळकडू आई-वडिलांकडून मिळाले.
शिवाय त्यांचे मामा संतोष मांडवकर यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. दर्शन यांचे वय अवघे २७ वर्षे आहे. तरुण शेतकरी बारमाही शेती करीत असून, विविध उत्पादने घेत आहेत.
पावसाळ्यात भात, नाचणी, वरी याशिवाय काकडी, चिबूड, दोडकी, पडवळ, तांबडा भोपळा, दुधी भोपळा, कारलीचे उत्पादन घेतात. दापोली शहरात स्टॉल लावून विक्री करीत आहेत.
यावर्षी पावसाळ्यात एक एकर क्षेत्रावर झेंडू लागवड केली होती. गणपती, दसरा, दिवाळीत उत्पन्न मिळाले, अद्याप झेंडू उत्पादन सुरू असून, मार्गशीर्ष संपेपर्यंत फुले मिळतील असे रहाटे यांनी सांगितले.
एक एकर क्षेत्रावर त्यांनी दहा हजार रोपे लावली होती. त्यापासून त्यांना सव्वा टन फुलांचे उत्पादन मिळाले असून, दरही चांगला मिळाला आहे. भात कापणीनंतर कुळीथ, पावटा, कडवा, मिरची, टोमॅटो, कोबी, वांगी, मूळा, माठ, पालक, मोहरी, मेथी या पालेभाज्यांसह कोबी, फ्लॉवर, नवलकोल, गवार लावत आहेत.
योग्य मशागत केली तर चांगले उत्पन्न मिळते, असा दर्शन यांचा अनुभव आहे. पावसाळ्यात वेलवर्गीय फळभाज्यांना वाढती मागणी असते. चांगल्या दर्जामुळे ग्राहकही समाधानी असतात.
जमीन खरेदी
दर्शन यांच्या वडिलांच्या मालकीची अडीच एकर जमीन असून, त्यावर शेती करतात. मात्र, बारमाही विविध प्रकारची शेती करण्यासाठी वैभव गावातील पडीक जमीन भाड्याने घेऊन शेती करतात. शेती उत्पादनातून दर्शन यांनी नवीन अडीच एकर जमीन खरेदी केली आहे. दर्शन शेतीमध्ये नवीन असले तरी प्रयोगशीलवृत्तीमुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करतात. यावर्षी झेंडू लागवडीचा पहिलाच प्रयोग त्यांचा यशस्वी झाला आहे.
बागायतीतूनही उत्पन्न
दर्शन यांनी १२० काजू व ६० आंबा लागवड केली आहे. शिवाय नारळी, सुपारीचीही लागवड आहे. बागायतीतूनही उत्पन्न सुरू झाले आहे. कोकणच्या लाल मातीत सर्व प्रकारच्या भाज्यांचे उत्पन्न घेत आहेत. बागायतीतील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून शेतीसाठी वापरत आहेत. पाणी, खतांचे योग्य व्यवस्थापन, योग्य मशागतीमुळे शेतीतून चांगले उत्पन्न मिळते, हे दर्शन यांनी सिद्ध केले आहे.
आई-वडील शेती करीत असताना, मी त्यांना मदत करायचो. त्यामुळेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरू केला. परंतु, शेतीची आवड असल्याने व्यवसाय बंद करून शेतीकडे लक्ष केंद्रित केले. केवळ पावसाळी शेती न करता, वर्षभर जास्तीत जास्त किती पिके घेता येतील? स्टॉलवर सात-आठ प्रकारच्या भाज्या एकाचवेळी ठेवता येतील का, याचे नियोजन करूनच लागवड करीत आहेत. शेतीमध्ये कष्ट आहेत, परंतु फळही चांगलेच मिळते. ग्राहकांकडून भाज्यांच्या दर्जाबद्दल चांगली प्रतिक्रिया मिळते तेव्हा आत्मविश्वास आणखी बळावतो. आई-वडील व मामाच्या मार्गदर्शनामुळे व धाकट्या भावाच्या मदतीने शेती करीत असून, त्यामध्ये यश आले आहे. - दर्शन दीपक रहाटे, कुडावळे (वाघजाईवाडी)