गजानन पाटीलदरिबडची : जत तालुक्यातील हळ्ळी येथील प्रगतिशील शेतकरी रवी यशवंत पाटील यांनी पारंपरिक पिकांना बगल देत माळरानावर सीताफळाची फळबाग फुलवली आहे.
एकरी १७ टन उत्पादन मिळाले. कमी खर्चात फळबागेमधून पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. पूर्व भागातील हळ्ळी येथील शेतकरी रवी पाटील यांची जमीन सीताफळाला पोषक असल्याने सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला.
पारंपरिक शेतीला फाटा देत २०१८ मध्ये सहा एकर जमिनीवर सीताफळ फळबाग करायचा निर्णय घेतला. सीताफळाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य जानेवारी ते जून महिन्यात झाडांना पाणी लागत नाही.
सीताफळ हे केवळ बांधावर किंवा जंगलात येणारे फळपीक आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा सीताफळांचा हंगाम असतो. बेंगळुरू येथील नॅशनल हाॅर्टिक्ल्चर बोर्डाकडून माहिती मिळाली. आधुनिक पद्धतीने लागवड केली.
कनमडी (जि. विजापूर) येथून आर्का सहाना जातीच्या काड्या आणून कलम बांधले. तीन एकरांत आठ वर्षांपूर्वी १० बाय १० वर इस्राईल पद्धतीने एक हजार झाडे लावले.
लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरूण कुळवून घेतली. शेणखत घातले, खड्यामध्ये रोपांना काठीचा आधार देऊन, सुतळीने सैल बांधले. दोन वर्षांनी उत्पन्नाला सुरुवात झाली आहे.
चाळणीने चाळून पांढऱ्या शुभ्र कापडावर पराग कण गोळा करायचे. ते पराग कण सिरिंजमध्ये भरून फळपाकळीत टोचायचे. गावठी जुगाड केले.
छाटणी घेतल्यावर २५ दिवसांनी फळधारणा सुरु होते. पाच महिन्यांनी फळ विक्रीला सुरुवात झाली. जवळपास एका सीताफळाचे वजन ९०० ग्रॅम भरले. एकरी १७ टन उत्पन्न मिळाले आहे.
कोल्हापूर येथील बाजारपेठेत मालाची विक्री होते. २० ते ७० रुपये किलो दर मिळाला. गावरान सीताफळापेक्षा आकाराने मोठे, रंगाने हिरवेगार असून, चवीला मधुर असते. सध्या आठ एकर सीताफळ आहे. यावर्षी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा आहे.
सीताफळाचे आरोग्यासाठी फायदेसीताफळात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी घटक आहेत. हृद्यविकार व मधुमेहावर उपयुक्त आहे. बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी सीताफळ उत्तम आहे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
दुष्काळी भाग सीताफळाला पोषक आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करावी. फळबाग शेतीकडे वळण्याची गरज आहे. - रवी पाटील, सीताफळ उत्पादक, हळ्ळी, ता. जत
अधिक वाचा: जनावरांचा गोठा बांधण्याआधी या बाबींचा विचार करा; होईल मोठा फायदा