सिद्धार्थ सरतापे
वरकुटे मलवडी : एखादी गोष्ट ठामपणे करायची म्हटले तर यश मिळते. त्यासाठी कोणतेही क्षेत्र अपवाद नसते.
अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रातील शिमला मिरचीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
आणखीही तीन ते चार लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची ही झेप ही प्रेरणादायी ठरली आहे. बनगरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य अजित बनगर यांनी त्यांचे मित्र संजय नरळे यांची सुमारे दीड एकर शेती भागीदारीत करायला घेतली आहे.
त्यानंतर मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार शिमला मिरचीची लागवड केली. यासाठी अजित बनगर आणि संजय नरळे यांनी यांनी पाच महिन्यांपूर्वी सिमला ५० नंबर या ढोबळी मिरचीची लागवड केली.
जुजबी मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात ही उत्पादन चांगले घेतले. त्यातच यावर्षी दिवाळीपर्यंत पाऊस तर कधी ढगाळ वातावरण राहत होते.
संजय नरळे यांच्या मालकीची शेती असून ते आणि अजित बनगर हे दोघे भागीदारीत करत आहेत. त्यांनी १० जूनला सिमला मिरचीची लागण केली होती. आतापर्यंत त्यांनी सुमारे ७० टन उत्पादन काढले आहे. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले आहेत.
त्यातून लागवड, औषधे आणि मशागतीचा खर्च वजा करता निव्वळ नफा १० ते ११ लाख रुपये राहिला आहे. अजून सिमला मिरचीचा प्लॉट सुरूच असून, त्यातून आणखी २० टन उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे अजून तीन ते चार लाख रुपये मिळण्याचा ही अंदाज आहे.
मिरचीची लागवड केल्यापासून ते उत्पादन घेईपर्यंत अनेक संघर्ष अन् कष्टाचा सामना करावा लागला. अधून-मधून येणारा पाऊस, ढगाळ वातावरण याचा परिणाम होतच होता. मात्र, वेळोवेळी केलेल्या औषधांच्या फवारण्या कामी आल्या. शेती करत असताना पत्नी रेश्मा हिचीही मला अनमोल साथ मिळाली. घरातील कामे आवरून वेळोवेळी शेती कामात केलेली मदत महत्त्वाची ठरली. - अजित बनगर, शेतकरी, बनगरवाडी
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर
