सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : मशीनने ऊस तोडणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील आनंदराव घाटगे या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांना तब्बल २४ हार्वेस्टिंग मशीनने ऊसतोडणी सुरू असल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
पहिल्या हंगामात १२ हजार टन ऊस मशीनने तोडला. पहिले मशीन १ कोटी २० लाखाला घेतले होते. आता त्याची किंमत १ कोटी ३२ लाखापर्यंत आहे. घाटगे यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असूनसुद्धा हा व्यवसाय आवडीने करतात.
अभिजित घाटगे अॅग्रीक्लचर तर अनिकेत बी. ई. मॅकेनिकल आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी व्यवसाय वाढवत जवळच्या नातेवाइकांना भागीदारी करत उद्योजक बनवले आहे. पहिले मशीन खरेदी केल्यानंतर अनिकेत घाटगे यांनी घरीच स्वतःचे वर्कशॉप सुरू केले.
हार्वेस्टिंग मशीन आणि ऑपरेटरचे आरळे गाव
घाटगे यांनी सुरुवातीला गावातील एकाला तामिळनाडू येथे प्रशिक्षणासाठी पाठवले. आज गावात ५० हून अधिक ऑपरेटर आहेत. तेच ऑपरेटर मशीन घेऊन मालक झाले आहेत. त्यामुळे आरळे गावाला हार्वेस्टिंग मशीन आणि ऑपरेटरचे गाव म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेक तरुणांना रोजगारांची संधी दिली आहे.
घाटगे यांची यंत्रणा
२४ ऊसतोड मशीन
५० इनफिल्डर ट्रॅक्टर
दोन मशीन मागे १ मॅनेजर
एका मशीनमागे ६ ट्रॅक्टर
२४ मशीनमागे १४४ ट्रॅक्टर
कामगारांची संख्या १२५
दिवसाला प्रति मशीनने १२० ते १५० टन ऊस तोडणी
पत्करलेल्या जोखमीने उद्योजक बनवले
पश्चिम महाराष्ट्रात पहिले मशीन आरळेच्या आनंदराव घाटगे यांनी खरेदी केले होते. पहिल्या वर्षी त्यांनी मशीनने १२ हजार ऊस टन तोडला होता. काही तांत्रिक कारणामुळे मशीन एक दोन वर्षे बंद करावे लागल्याने त्यांच्यापुढे प्रश्नांचा डोंगर उभा होता. ऊसतोडीतील अनेक समस्यांमुळे हार्वेस्टिंगच्या मशीन तोडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य मिळत आहे.
अधिक वाचा: खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर