शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्टा असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोखरी (ता. वैजापूर) शिवारात अलीकडे गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाच्या तुरीने मोठे क्षेत्र काबिज केले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, ऊस आदी नगदी पिकांना फाटा देत शेतकरी आता तूरशेतीकडे वळले आहेत.
अवघ्या २२००-२३०० लोकसंख्येच्या या गावात सध्या ५० एकरहून अधिक तूर क्षेत्र आहे. ज्याची सुरुवात झाली शेतकरी वाल्मिक कारभारी माळकर यांच्या २०२२-२३ मधील गोदावरी वाणांच्या पहिल्या लागवडीपासून. सोशल मिडियावर मिळालेली माहिती पाहून विविध ठिकाणी संपर्क करत कृषी सहाय्यक, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर रामेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने माळकर यांनी तूर शेती यशस्वी केली.
पहिल्या वर्षी जेमतेम पाऊस पडला असतानाही आणि अल्प नियोजन असूनही एकरी ८ क्विंटल उत्पादन माळकर यांना मिळाले. तर गत वर्षी दीड एकर क्षेत्रात ४ फुट बाय २ फुट अंतरावर त्यांनी तब्बल १६ क्विंटल उत्पादन घेतले. ज्यासाठी प्रभावी ठिबक व्यवस्था, खत व्यवस्थापन, शेंडा खुडणी आदींचा फायदा झाल्याचे ते आवर्जून सांगतात.
यंदा वडीलोपार्जित ११.५ एकर क्षेत्रापैकी २ एकर क्षेत्रावर ४ फुट बाय २ फुट अंतराने त्यांनी तुरीची लागवड केली आहे. ज्यासाठी एकरी दोन बॅग १०:२६:२६ खत, तसेच ४५-५० व ६५-७० दिवसांच्या अंतरावर दोन वेळा शेंडा खुडणी केली आहे. शेंगा भरणीच्या सुरुवातीला बुरशीनाशकाची एक फवारणी देखील केली आहे असे माळकर सांगतात. दरम्यान यंदा त्यांना ३०-३२ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.
विविध अडचणींवर तूर ठरतेय फायद्याची
दिवसेंदिवस बिकट होत चाललेली मंजूरांची समस्या, विविध पीक उत्पादन घेत असतानाही वाढलेला उत्पादन खर्च आणि अन्य सर्व अडचणींवर तोंड देत असताना बाजारातील अनियमित दरांमुळे शेतकरी मोठ्या मेटाकुटीला आले आहेत. अशातच माळकर यांच्या प्रयत्नांमुळे पोखरी शिवारात आलेली तूर आता शेतकऱ्यांना फायद्याची भासू लागली आहे.
.. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत जायला सज्ज
• तुरीचे क्षेत्र वाढत असताना अनेकदा सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे बाजारभाव ढासळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे तुरीला देखील पर्याय शोधावा अशी चर्चा शेतकरी करतात.
• मात्र दर तुरीचे कमी होऊ शकतात, पण तूर डाळीचे नाही. तेव्हा आम्ही दालमिलद्वारे तूर प्रक्रिया करून डाळ विकू! मात्र तोटा घेणार नाही, असेही माळकर आवर्जून सांगतात.
मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविणारी तूर
तूर पिकाच्या पानगळीमुळे मातीला अतिरिक्त सेंद्रिय कर्ब मिळतो जो मातीची उर्वरक क्षमता वाढवतो. तसेच पिकांचे मूळ खोलवर जात असल्यामुळे मातीत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि जलधारण क्षमता वाढते. ज्यामुळे तूर हे मातीसाठी अत्यंत फायदेशीर पीक आहे.
