मेहरून नाकाडेरत्नागिरी: लग्नानंतर शेतकरी नवऱ्याबरोबर शेतात कसण्याचे निश्चित केले. अन्यत्र मजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीत विविध पिके घेऊन त्याची विक्री करीत आहेत.
दापोली तालुक्यातील कुडावळे-देवखळवाडी येथील राजश्री सुभाष सावंत सलग दहा महिने त्या विविध पिके घेतात.
मार्चपासून पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोणतेही उत्पन्न घेत नाहीत. स्वतः शेती करून उत्पादित शेतमाल स्वतःच विकत असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होत आहे.
पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मार्चपर्यंतच राजश्री पिके घेतात. मे महिन्यात मात्र जूनमध्ये लागवड करणाऱ्या पिकांसाठी जमिनीची मशागत, बी-बियाणे गोळा करणे, रोपे तयार करण्याचे काम करतात.
पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी, वरी तसेच काकडी, चिबूड, कारली, दोडकी, दुधीभोपळा, भेंडी, लाल भोपळ्याचे उत्पादन घेतात. भात कापणीनंतर जमिनीतील ओलाव्यावर पावटा, कुळीथ, कडवा, कलिंगड लागवड करतात.
याशिवाय मुळा, माठ, मेथी, शेपू, चवळी, पालक या पालेभाज्यांशिवाय भेंडी, वालीच्या शेंगा, घेवडा, वांगी, मिरची, कोथिंबिरीची लागवड करीत आहेत.
त्यामुळे उपलब्ध जमिनीवर टप्प्याटप्प्याने किती व कोणती पिके घेण्याबाबत योग्य नियोजन करून लागवड करतात. उत्पादित भाज्यांची विक्री मात्र दापोलीच्या बाजारात करीत आहेत.
स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः विक्री करीत असल्यामुळे त्याचा त्यांना थेट फायदा होत आहे. राजश्री व त्यांचे पती सुभाष दोघेही सतत शेतात परिश्रम घेत आहेत.
या दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा असून, दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करून दिले आहे. मुलगा पदवीधर असून तो मुंबईत नोकरी करतो.
शेतीवरच मुलांचे शिक्षण, लग्न त्यांनी करून दिले आहे. शेतातील कष्टामुळे संसाराचा गाडा ओढण्यात राजश्री यशस्वी झाल्या आहेत.
सेंद्रिय खतांचा वापरशेतातील पालापाचोळा एकत्र करून त्यामध्ये शेणखत मिसळून त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती राजश्री करीत आहेत. सेंद्रिय खताबरोबर कोंबड्यांची विष्टाही वापरत आहेत. कोणतेही रासायनिक खत वापरत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पिकाचा दर्जा व उत्पादन सरस राखण्यात यश आले आहे.
हंगामी भाज्यांची लागवडप्रत्येक हंगामात कोणत्या भाजीची लागवड करावी हे निश्चित असते. त्याप्रमाणे बाजारात ग्राहकांकडून मागणी असते. ग्राहकांची मागणी ओळखून त्या-त्या हंगामात पिकांची लागवड करीत आहेत. सध्या चिबूड, काकडी, पडवळ, दोडकी, शिराळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, भेंडीसाठी वाढती मागणी आहे.
कलिंगडातून चांगले उत्पन्नभात कापणीनंतर कलिंगड लागवड राजश्री करीत आहेत. शिमगोत्सवात कलिंगडाचा खप चांगला होतो. त्यामुळे योग्य प्रकारे जमिनीची मशागत करून स्वतः तयार केलेल्या रोपांची त्या लागवड करतात. शिमगोत्सव व मुस्लीम बांधवांच्या रमजानमध्ये कलिंगडाचा चांगला खप होतो. यामुळे चार पैसेही मिळतात. शेतीमध्ये कष्ट केल्यास चांगले उत्पादन शक्य आहे.