दत्ता मोरस्कर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील रामनगर येथील एका शेतकऱ्याने २५ गुंठे क्षेत्रावर ब्रोकली (हिरव्या रंगाची गोबी) आणि रेड कॅबेज (लाल गट्टा कोबी) या पिकाच्या आठ हजार रोपांची लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांचे हे पीक असून त्यातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
रामनगर परिसरात ब्रोकली पिकाने चांगलेच मूळ धरले आहे. इतर भाजीपाल्यासोबत हे पीक घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फुल गोबीसारखे दिसणारे हे पीक असून त्याची भाजी केल्यास आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगतात. रामनगर येथील सचिन शेळके यांनी २५ गुंठे क्षेत्रावर ब्रोकली या पिकाची लागवड केली असून यात त्यांनी आठ हजार रोपे लावली आहेत.
२ जानेवरी रोजी या पिकाची लागवड झाली असून या पिकाच्या रोप खरेदीसाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला आहे. याशिवाय फवारणी, खताकरिता सात हजार रुपये, अंतर्गत मशागत तीन हजार आणि रोपे लागवडीसाठी दोन हजार, असा एकूण २२ हजार खर्च त्यांनी या पिकासाठी केला आहे.
५ गुंठे क्षेत्रातून मिळते दहा टन उत्पादन
• २५ गुंठे क्षेत्रात या पिकाचे एक लाख रुपयांचे उत्पन्न होते. सध्या शंभर रुपये प्रतिकिलो प्रमाणे या पिकाला बाजारात दर मिळत आहे. २५ गुंठे क्षेत्रातून दहा टनाचे उत्पादन होते, असे शेळके यांनी यावेळी सांगितले.
• अर्धा किलो वजनाच्या फुलाला ग्राहकांची अधिक मागणी आहे. तर एक किलो वजनापर्यंत ही फुले तयार होतात. विशेष म्हणजे, या पिकाला इतर पिकापेक्षा अधिक पाणी लागते, असे शेळके यांनी सांगितले.
हिरव्या ब्रोकलीचे फूल काढून घेतल्यानंतर त्या रोपाला आणखी दोन वेळा फुले येतात. तसे पुन्हा पीक घेतल्यास उत्पादन खर्च कमी होतो. मात्र, रेड कॅबिजला एकदाच गट्टा येतो. या पिकाची विक्री छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात केली जाते. २५ गुंठे क्षेत्रातून दहा टनांचे उत्पादन होत असून त्यातून एक लाख रुपये मिळतात. - सचिन शेळके, शेतकरी, रामनगर.