सातारा : टँकरने पाणी विकत घेऊन कलिंगड फळ घेतले. व्यापाऱ्याने कमी दराने मागितले म्हणून स्वतःच बाजारपेठ शोधली आणि विक्री केली. अवघ्या अर्धा एकरातील कलिंगडातून सुमारे अडीच लाखांचे उत्पन्न मिळवले.
तसेच आता आंतरपीक असलेल्या मिरचीतूनही चार ते पाच लाख मिळण्याची आशा आहे. ही यशोगाथा आहे माण तालुक्यातील भाटकीच्या राहुल रकटे या तरुण शेतकऱ्याची.
पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या माण तालुक्यातील शेतकरी राहुल रकटे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर कलिंगड घेतले होते. त्यामध्ये आंतरपीक म्हणून लाल लवंगी मिरचीही लावली आहे.
कलिंगड आणि मिरचीसाठी त्यांनी म्हसवड येथून टँकरने पाणी विकत आणून दिले. पाण्याच्या संकटावर मात करून ही दोन्ही पिके चांगली आणली. मात्र, कलिंगड पक्व झाल्यावर विक्रीचा प्रश्न आला.
व्यापाऱ्यांनी जागेवरून नेण्यासाठी कलिंगडाला ७ ते ८ रुपये देण्याचे जाहीर केले. व्यापाऱ्याचा हा दर रकटे यांना मान्य झाला नाही. त्यामुळे त्यांनी जिद्दीने स्वतःच बाजारपेठ शोधण्याचा निर्णय घेतला.
या जिद्दी शेतकऱ्याने कलिंगडे जवळपासच्या आठवडा बाजारांमध्ये विक्री केली. त्यामुळे किलोचा विचार करता २० ते २५ रुपये भाव मिळाला. यातूनच त्यांनी अर्धा एकरातील कलिंगडातून सुमारे अडीच लाख रुपये मिळवले.
मिरची चार-पाच लाख देणार!
सहुल रकटे यांनी कलिंगडात आंतरपीक म्हणून घेतलेली मिरची सध्या शेतात आहे. या मिरचीमधूनही जवळपास चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. पाणी विकत आणून त्यावर अर्धा एकरात लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्याने राहुल रकटे यांचे कौतुक होत आहे.
अधिक वाचा: नोकरी अन् व्यवसायापेक्षाही अधिक नफा कमवून देतेय फौजींची शेती; १ एकर कलिंगडातून ३ लाखांची कमाई