मेहरून नाकाडे
वाणिज्य शाखेची पदवी संपादन केल्यानंतर दोन वर्षे टोल ऑडिटर म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या राजवाडी (ता. राजापूर) येथील शेखर श्रीकांत श्रृंगारे याने काम केले; परंतु नोकरीत त्याचे मन रमले नाही. त्याने शेती व त्यावर पूरक शेळीपालन व्यवसाय सुरू केला, वर्ष २०१७ मध्ये गावरान जातीच्या केवळ आठ शेळ्यांवर शेखरने व्यवसाय सुरू केला आणि गेल्या आठ वर्षांत त्याने त्यात आपला चांगलाच जम बसवला आहे.
सध्या त्याच्याकडे ७५ शेळ्या आहेत. शेखरची वडिलोपार्जित जमीन असून, त्यावर वडील शेती करत असत. खरीप हंगामात भात, भाजीपाला लागवड करत असत. शेखरनेही खरीप हंगामात भातलागवड सुरू ठेवली असून काकडी, चिबूड, दोडका, पडवळ, भोपळा, भेंडी, मुळा, माठ यांसारख्या भाज्यांची लागवड करत आहे.
भात उत्पादन घेत असला तरी त्याचा वापर केवळ कुटुंबासाठी करत आहे. तसेच भाजीपाला कुटुंबीयांसाठी ठेवून उर्वरित गावातच विक्री करतो. बागायतीमध्ये काजू लागवड केली असून, ओली, सुकी बी तो विकत आहे. पाण्याअभावी बारमाही शेती शक्य नसल्यामुळे शेतीला पूरक शेळीपालन व्यवसायावर मात्र त्याने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
शेळ्यांसाठी बंदिस्त शेड उभारली असून, सकाळ, संध्याकाळ दोन तास शेळ्यांना चरायला बाहेर पाठवले जाते. केवळ चाऱ्यावरच शेळ्यांची चांगली वाढ होत असून, बाहेरचे खाद्य देण्याची आवश्यकता भासत नसल्याचे सांगितले. एका शेळीपासून ७ ते ८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
तसेच शेळ्यांची विष्ठा/ लेंडीचा वापर काजू बागायतीसाठी कंपोस्ट खतनिर्मितीसाठी करून उर्वरित विष्ठा विकत असल्याचे सांगितले. ५० किलॉच्या लेंडी पोत्याकरिता २५० रुपये मिळतात. शिवाय तीन महिने व त्यापेक्षा जास्त महिन्यांनंतर शेळीची विक्री केली जाते. त्यामध्ये चांगला फायदा होतो. नोकरीपेक्षा शेखरने शेती व पूरक शेळीपालन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. हाच व्यवसाय आणखी वाढविणार असल्याचे शेखरने सांगितले.
दर पाहून काजू विक्री
शेखर याने लागवड केलेल्या काजूचे उत्पादन सुरू झाले आहे. ओली, सुकी काजू बी तो विकतो. सुकी काजू बी विकताना मात्र दर पाहूनच विक्री करत असल्याचे शेखरने सांगितले. बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर झाला असला, तरी कंपोस्ट खतांचा वापर शेखर करीत असल्यामुळे उत्पादन चांगले आहे.
संकरित जातीच्या शेळ्या
सुरुवातीला गावरान जातीच्या शेळ्यांपासून शेखरने व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी संकरित जातीच्या शेळ्या आणल्या. सध्या त्यांच्याकडे कोटा, शिरोळी, सोजत, उस्मानाबादी शेळ्या आहेत. दररोज सकाळ, संध्याकाळी प्रत्येकी दोन तास त्यांना बाहेर चरायला सोडले जाते. या शेळ्या चांगल्या वजनाच्या असल्यामुळे दर चांगला मिळतो.
पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे नोकरी केली. शेतीची आवड असल्याने शेती व पूरक शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. गावरानपेक्षा संकरित जातीच्या शेळ्यांची वाढ चांगली होते, वजनही चांगले भरते म्हणून खप चांगला होतो, दरही मिळतो. - शेखर श्रृंगारे, राजवाडी (राजापूर).
