Join us

फायनान्स कंपनीतील नोकरी सोडली अन् नीलेशचे शेतीतून नशीबच बदलेले; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:14 IST

farmer success story तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.

शिवाजी गोरेदापोली : तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.

मुंबईत बी.ए. पर्यंत शिक्षण घेऊन टाटा फायनान्स या कंपनीत नोकरी करत असतानाही नीलेशचे मन कॉर्पोरेट जगतात रमले नाही. गावाची ओढ आणि शेतीबद्दलची आवड त्याला कायम अस्वस्थ करत होती.

अखेर दोन वर्षे दापोलीत टाटा फायनान्समध्ये काम केल्यानंतर त्याने धाडसी निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देऊन तो पूर्णवेळ शेतीत उतरला.

बरेच तरुण रोजगाराच्या शोधात गाव सोडून मुंबईची वाट धरतात. मात्र नीलेशने उलट मार्ग निवडला. शून्य भांडवलातून सुरू केलेली त्याची शेती व्यवसायाची कथा आज कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

घरातील म्हशी-गाई यांचा आधार आणि केवळ सात हजार रुपयांच्या भांडवलातून त्याने सुरुवात केली. प्रारंभी भाजीपाला शेतीतून आणि थोड्याफार कलिंगड लागवड मधून उत्पन्न मिळाले.

पहिल्या वर्षी केवळ एक टन कलिंगड उत्पादन झाले, पण त्याने हार मानली नाही. जिद्द, चिकाटी आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करत दहा वर्षात तो आता ५० टन कलिंगड उत्पादनापर्यंत पोहोचला आहे. कलिंगड लागवडीने त्याचे नशीब बदलले.

परंतु त्यावरच अवलंबून न राहता नीलेशने लागवडीत वैविध्य जपले आहे. भात कापणी झाल्यानंतर त्याच शेतात कलिंगड, मका, मिरची, भेंडी, वांगी, पालेभाज्या, कोबी-फुलकोबी तसेच स्ट्रॉबेरी अशी विविध पिके घेऊन दुबार पीक पद्धतीचा अवलंब केला.

या पद्धतीमुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर होऊन वर्षातून दोन पिकांचा नफा मिळू लागला. सेंद्रिय शेतीकडेही त्याचा कल असून, गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखतावरच त्याने शेती फुलवली आहे.

त्याच्या या प्रवासात मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण काम शेतकरी पंकज जागडे यांनी केले. त्यांच्या सल्ल्याने नीलेशने आधुनिक शेतीचे धडे घेतले.

शेती किफायतशीर होऊ शकते, पण त्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री व वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड आवश्यक आहे, हे सत्य नीलेशने मनोमन पटवून घेतले आणि प्रत्यक्षात उतरवले.

आज देशभरातील अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन हतबल होतात. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण नीलेश तांबेने कर्जाशिवाय केलेली लागवड हे यशस्वी शेती उत्तम उदाहरण आहे.

सुशिक्षित तरुणाने शेतीकडे वळले तर ती नुसती किफायतशीरच नव्हे तर सुखकर ही ठरते, हेच नीलेशने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

पतीला अस्मिताची साथ◼️ नीलेशच्या या यशात त्याची पत्नी अस्मिता तांबे यांचीही मोठी साथ आहे. स्वतः पदवीधर असलेली अस्मिता पतीसोबत शेतीमध्ये रमत असून, शेतीकामात खांद्याला खांदा लावून मदत करते.◼️ कोकणातील तरुणाई मुंबईच्या आकर्षणाला बळी पडत असताना, या दाम्पत्याने गावात राहून शेतीत रोजगार निर्माण करून दाखवला आहे.

लागवडीने दिला आधार◼️ शेतीला जोडधंदा म्हणून नीलेशने कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि थेट भाजी विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारांना तोंड देताना त्याला आधार मिळतो.◼️ आर्थिक अडचणी असूनही आज त्याने स्वतःचे घर, शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे आणि वाहतुकीसाठी गाडी मिळवली आहे. एवढेच नाही तर अतिरिक्त जमीन भाड्याने घेऊन उत्पादन वाढवले आहे.

शेतीमुळे आम्ही सुखी आहोत, सर्व काही मिळाले आहे, हीच खरी समाधानाची भावना आहे. - नीलेश तांबे, नानटे

अधिक वाचा: बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळणाऱ्या 'ह्या' भाताने आदिवासी शेतकऱ्यांची राने बहरली

English
हिंदी सारांश
Web Title : Job in Finance Company Left; Nilesh's Destiny Changed Through Farming

Web Summary : Nilesh Tambe, a B.A. graduate, left his finance job to pursue farming in his village. Starting with minimal capital, he cultivated various crops, including watermelon, achieving significant success through dedication and modern techniques. His story inspires farmers in Kokan.
टॅग्स :शेतीशेतकरीपीककोकणपीक व्यवस्थापनभाज्यापोल्ट्रीगायदुग्धव्यवसायसेंद्रिय शेतीनोकरी