लक्ष्मण सरगर
आटपाडी : शेटफळे ता.आटपाडी गावचा युवक संतोष काशिनाथ ननवरे यांनी पुणे येथे असलेली चांगली नोकरी सोडूनशेती व्यवसायाला प्राधान्य दिले.
त्यांच्या पत्नी व आई च्या मदतीने खडकाळ माळरानावर केशर आंब्याच्या लागवडीतून वर्षाला पाच लाख रुपयांचे उत्पादन घेत यशस्वी भरारी घेतली आहे.
खडकाळ माळरानावर जेथे कुसळ ही उगवत नाही अशा माळरानावर ननवरे कुटुंबियांनी चक्क आमराई फुलवली आहे. ज्या युवकांना नोकरी नाही म्हणून ओरड होते अशा युवकांना संतोष ननवरे व त्यांचे कुटुंबीय एक प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
एकूण १ एकर क्षेत्रात पाचशे झाडे आहेत. कोरोना काळात २०२०-२०२१ मध्ये केशर रोपे आणून आठ बाय तेरा अशी लागवड करण्यात आली आहे.
या वर्षांपासून उत्पादन सुरू झाले असून प्रथम तोडा हा सरसकट २३० रु. प्रति किलो दराने जागेवर विक्री करण्यात आली आहे. सरासरी पाच ते सहा टन केशर जाण्याचा अंदाज आहे.
युवा शेतकरी संतोष ननवरे व त्यांच्या पत्नी व आई यांनी शेटफळेच्या बंजर ओसाड असलेल्या माळरानावर काबाडकष्ट करून नंदनवण फुलवले आहे.
त्यांनी गावातील तरुणांना आदर्श घालून दिलाय कि तुम्ही नोकरीच्या पाठीमागे नं लागता, शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळवू शकता.
सध्या टेंभु योजनेचे पाणी सर्वत्र आले आहे. या पाण्याच्या जीवावर युवा शेतकरी वर्ग आपल्या शेतात विविध प्रयोग करून शेती व्यवसाय करू लागला आहे.
खडकाळ फोंड्या माळरानावर पाणी नेऊन डाळिंब, पेरू, आंबे, यासह अन्य फळ पिकांची यशस्वी लागवड करून वर्षाला सातबते आठ लाख रुपयांचे एकरी उत्पादन काढू लागला आहे.
शहरात नोकरीच्या निमित्ताने राहून धकाधकीचे जीवन, शहरातील राहणीमान याला अपुरा पडणारा पगार या अनेक कराणांनी युवक वर्ग सध्या बेजार झाला आहे.
अशातच युवा शेतकरी संतोष ननवरे यांनी पुणे येथे असलेली चांगली नोकरी सोडून गावातच ऑनलाइन सेवा केंद्राच्या माध्यमातून गावकऱ्यांना विविध सेवा देण्याचे काम सुरू केले आहे.
याच सोबत शेतीशी असलेलं घट्ट नातं जोपासत उत्तम शेतीही सुरू केली आहे. शेतीतून भरघोस उत्पादन मिळवत युवा शेतकरी म्हणून यशस्वी झाले आहेत.
नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले होतो. १६ वर्षे नोकरी केली. मात्र कोरोना कालावधी मध्ये खर गावचे व शेतीचे महत्व समजले. त्यावेळी आंबा व सीताफळाची लागवड केली. कोरोनानंतर नोकरी सोडून दिली. गावातच ऑनलाइन सेवा (ग्राहक सेवा केंद्र) देण्याचे काम सुरू केले. शेती बरोबरच अन्य व्यवसाय हा आपल्या अर्थार्जनाला हातभार लावत असतो. आई व पत्नीच्या माध्यमातून शेती व शेती बरोबरच गावरान (देशी) कुक्कुटपालन व्यवसायाकडे हळूहळू वाटचाल सुरू आहे. - संतोष काशिनाथ ननवरे , युवा शेतकरी
अधिक वाचा: मेंढरं चारणारा बिरदेव युपीएससीच्या रँकमध्ये झळकला; चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा