संतोष धुमाळ
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांनी २० गुंठे क्षेत्रात ढबू मिरची पीक घेऊन ४० टन उत्पादन मिळवले आहे. तसेच यातून १५ लाख रुपये आतापर्यंत मिळविले आहेत.
आणखीही त्यांना उत्पन्न मिळणार आहे. यामुळे सोळस्कर यांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर शेती तोट्यात म्हणणाऱ्यांसाठीही आदर्श आहे.
सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांची प्रगतशील शेतकरी अशी सर्वदूर ओळख आहे. शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
२०१२ मध्ये त्यांनी हायड्रोपोनिक शेतीचा प्रयोग केला. तसेच त्यांनी टोमॅटो, कारली, दोडका, झेंडू यांसारख्या अनेक पिकांचे उच्चांकी उत्पादन घेत लाखो रुपयांची कमाईही केली आहे.
यावर्षी त्यांनी इंद्रा जातीच्या ढबू मिरचीचे उच्चांकी उत्पादन घेत नवा विक्रम केला आहे. २० गुंठ्यांत ४० टन उत्पादन घेत आतापर्यंत १५ लाख रुपये कमविले आहेत. तसेच आणखी काही महिने उत्पादन मिळणार असल्याने पैसेही सुरूच राहणार आहेत.
शेतकरी सोळस्कर यांनी खरेतर यावर्षी १० एप्रिलला ढबू मिरचीची लागवड केली होती. पूर्व मशागत, लागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड, खत, पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते.
३ कोटी लिटर पाणी साठवण
सोळशी गावात पाण्याची मोठी समस्या आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविल्याशिवाय शेतीतून उत्पादन काढणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन ३ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता सोळस्कर यांनी विहिरी, शेततळे यांच्या माध्यमातून निर्माण केली आहे.
शेती परवडत नाही हा सूर पूर्ण चुकीचा आहे. शेतीचा सूक्ष्म अभ्यास, महाराष्ट्रासह इतर राज्यातील पिके, तेथील बाजारपेठेतील परिस्थिती याचा सखोल अभ्यास, गटचर्चा करून पिकांची निवड केल्यास निश्चित फायदा होतो. त्याचबरोबर पिकातून जास्तीचा नफा मिळविण्यासाठी त्या पिकाची जीवन मर्यादा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. - जालिंदर सोळस्कर, प्रगतशील शेतकरी, सोळशी
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार