दिलीप मोहिते
विटा: कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.
सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकरशेठ साळुंखे यांनी परिसरात जलसिंचन योजनांचे पाणी आल्यानंतर तामिळनाडूच्या कोईमत्तूर येथील त्यांच्या गलाई व्यवसायाला बाजू देऊन शेतीत विविध प्रयोग केले आहेत.
ड्रॅगन फ्रूट, नारळ, पेरू, सफरचंद, मोसमी, देशी केळी यासह थायलंड जातीच्या फणसाची सुमारे १ हजार ३०० झाडे लावली आहेत. थायलंड देशातील हायब्रीड जातीच्या या फणसाची रोपे त्यांनी कोलकाता येथून आणली.
पहिल्या तीन एकर क्षेत्रात दोन्ही झाडांतील अंतर १५ फूट तर उर्वरित अडीच एकर क्षेत्रात लावलेल्या रोपांत दहा फूटांचे अंतर ठेवले आहे.
या फणसाच्या बागेत त्यांनी पेरू व देशी केळीचेही अंतरपीक घेतले आहे. फणसाची लागण केल्यानंतर दीड वर्षानंतर फळ येण्यास सुरुवात झाली आहे.
दीड वर्षानंतर पहिल्या तोडणीला प्रत्येक झाडाला त्यांना ५० फळे मिळाली आहेत. तर तीन वर्षांनंतर एका झाडाला २५० ते ३०० फळे मिळू लागले आहे.
कच्च्या फणसाला भाजीसाठी मुंबई बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हा फणस पिकल्यानंतर चवीला मधासारखा गोड लागतो.
या फणसाच्या झाडापासून वर्षातील सलग आठ महिने उत्पन्न मिळते. मुंबईच्या मार्केटमध्ये या फणसाला प्रतिकिलो २० रुपयांपासून ६० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
दुष्काळी शेतीत विविध प्रयोग करून शेतकरी जयकर साळुंखे यांनी शेतकऱ्यांना सकारात्मक संदेश दिला असून, सांगली जिल्ह्यातील त्यांचा पहिला थायलंड फणसाचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
इस्राईल पद्धतीची लागण
◼️ शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिकतेकडे वळले पाहिजे.
◼️ आपल्या नेहमीच्या पिकांना मिळणार भाव आणि त्यासाठी होत असलेला खर्च, यात मोठी तफावत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
◼️ माझ्या माळरान शेतीत इस्राईल पद्धतीने थायलंडच्या फणसाची लागण करून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले आहे.
◼️ त्यातच पेरू व देशी केळीचेही आंतरपीक घेतले आहे.
◼️ हा प्रयोग यशस्वी झाला असून, फणसाला चांगला भावही मिळत आहे.
अधिक वाचा: फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर
