Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोपे निर्मितीने गाठला 'कळस'.. इंदापूरातील हे दुष्काळी गाव ठरलं रोपवाटिकेत सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 10:43 IST

पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कळस हे खडकवासला कालव्यावरील अनियमित पाण्यामुळे अवर्षणप्रवण गाव. मात्र, रोपवाटिकाचे गाव म्हणून ते उदयास आले आहे. गावात सुमारे शंभराहून अधिक रोपवाटिका असून, एक कोटीपेक्षा अधिक रोपांची निर्मिती या ठिकाणी होत आहे.

सतीश सांगळेपुणे : जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कळस हे खडकवासला कालव्यावरील अनियमित पाण्यामुळे अवर्षणप्रवण गाव. मात्र, रोपवाटिकाचे गाव म्हणून ते उदयास आले आहे. गावात सुमारे शंभराहून अधिक रोपवाटिका असून, एक कोटीपेक्षा अधिक रोपांची निर्मिती या ठिकाणी होत आहे.

गेली ४० वर्षे हा व्यवसाय या ठिकाणी रुजला, या व्यवसायातून या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामधून वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. येथील रोपवाटिकेत दरवर्षी सुमारे ७० लाख गुलाब व इतर शोभेची ३० लाखांहून अधिक रोपे तयार केली जात आहेत, प्रामुख्याने या ठिकाणी गुलाब रोपांची निर्मिती केली जाते.

येथील रोपवाटिकाधारकांनी विविध रोपे तयार करून आपल्या व्यवसायाला मोठे स्वरूप दिले. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ५०० आहे. रोपवाटिका व्यवसाय उत्पन्नाचे साधन बनू शकतो, हे लक्षात आल्यावर गावातील लोकांनी लहान स्तरावर रोपवाटिका सुरू केल्या. गावातील लोकांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणून रोपवाटिकांकडे पाहिले जाते.

सुरुवातीला गावामध्ये पाच-सहा रोपवाटिका होत्या, परंतु, हळूहळू स्पर्धा वाढली. यामुळे रोपवाटिकांची वाढ होत गेली, आज गावात शंभर रोपवाटिका आहेत. रोपवाटिका व्यवसायामुळे गावातील अर्थकारणावर चांगला परिणाम झाला आहे. गावात रोजगारनिर्मिती होत असून, माळीकाम, कलमनिर्मितीतून पूरक उद्योग सुरू झाले आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठीसुद्धा रोजगाराची उपलब्धता झाली. रोपवाटिकांमुळे गावाच्या लौकिकात वाढ झाली.

रोपवाटिका उपक्रमाला १९८५ पासून सुरुवात- साधारणपणे १९८५ मध्ये गावात पहिली रोपवाटिका सुरू झाली. बापूराव गावडे यांनी तो सुरु केली. त्यांच्या प्रयत्नांतूनच गावामध्ये रोपवाटिका व्यवसायाला गती मिळाली.- गावडे यांच्या रोपवाटिकेमध्ये गावातील दहा ते बारा ग्रामस्थांना रोजगार मिळाला. काही हजार रुपयांची गुंतवणूक करून सुरू केलेल्या या व्यवसायाचा विस्तार पन्नास लाखांपर्यंत पोहोचला.- गावातील लोकांना त्यांनी प्रशिक्षित केले. गावात फळझाडे, फुलझाडांची कलमे, रोपे पुरविणत्या रोपवाटिका आहेत. राज्यातच नव्हे, तर परराज्यातदेखील गावातून दरवर्षी सुमारे पन्नास लाखांवर कलमे, रोपे विक्रीस जातात.

रोपवाटिकांची देखभाल- कलमे, रोपांसाठी सेंद्रिय खत, गांडूळ खताचा वापर.- दर पंधरा दिवसांनी कलमांना जिवामृत दिले जाते.- कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते.- कलमनिर्मिती, व्यवस्थापन आणि वाहतूक उद्योगातून गावातील लोकांना रोजगार मिळाला.- गावातील प्रत्येक घरात उत्पन्नाचे साधन तयार झाले.

कुठल्या रोपांची निर्मितीगुलाच, लिंब, चिच, अशोक, गुलमोहर, करंज, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम, निलगिरी, बांबू, रेन ट्री, पारिजातक, फायकस, या शोभेच्या झाडांची मोठी विक्री होते. तसेच, मिरची, वांगी, फळभाज्यांना व उन्हाळी हंगामात शोभेच्या रोपांना चांगली मागणी असते. दाक्षे, डाळिंब, नारळ, चिकू, अंजीर, पेरुच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर येथे विक्री होते.

या ठिकाणी मागणी- आंधप्रदेशमधील विशाखापट्टणम, राजमंडी- गुजरातमधील अहमदाबाद- कर्नाटकमधील विजापूर- महाराष्ट्रातील पुणे, लातूर, नांदेड, उस्मानाबाद

उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येतो. रोपवाटिकाधारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. सध्या मागणी कमी आहे. गावात सुमारे शंभर रोपवाटिका आहेत. यावर हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. - विलास पानसरे, कळस (रोपवाटिकाधारक)

अधिक वाचा: कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

टॅग्स :शेतीशेतकरीव्यवसायइंदापूरपुणेफलोत्पादनफुलशेतीभाज्याफळेफुलं