समाधान इंदलकर
ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे धाव घेत असताना धाराशिव जिल्ह्याच्या पाटसांगवी (ता. भूम) येथील विशाल अरुण परकाले या तरुणाने मात्र उलटा प्रवास करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पुण्यातील खासगी कंपनीतील 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून विशाल यांनी आपल्या गावात आधुनिक दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य उभे केले असून, आज ते परिसरातील शेकडो तरुणांसाठी 'रोल मॉडेल' ठरत आहेत.
काही वर्षांपूर्वी विशाल परकाळे पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत कार्यरत होते. मात्र शहरातील वाढती महागाई, कामाचा ताण आणि कुटुंबापासून दूर राहून होणारी ओढाताण, यामुळे त्यांनी शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला.
'शहरात नोकरी करून आपण फक्त आपला उदरनिर्वाह करू शकतो, पण स्वतःचा व्यवसाय केला तर कुटुंबासोबत राहून प्रगती साधता येते,' या विचाराने त्यांनी गावाकडे परतण्याचे ठरवले.
केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याला जोडधंद्याची जोड देणे आवश्यक होते. विशाल यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेची माहिती घेतली आणि त्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतले.
या भांडवलातून त्यांनी उच्च जातीच्या गाींची खरेदी केली. सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झालेला हा व्यवसाय आज एका मोठ्या डेअरी फार्ममध्ये रूपांतरित झाला आहे.
एकात्मिक शेतीचा फायदा...
दुग्ध व्यवसायामुळे केवळ दुधाचेच उत्पन्न मिळते असे नाही, तर जनावरांच्या शेणापासून मिळणारे उत्तम दर्जाचे 'शेतखत' विशाल यांच्या शेतीसाठी वरदान ठरले आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे शेतीचा पोत सुधारला असून, उत्पादनातही वाढ झाली आहे. अशाप्रकारे शेती आणि दुग्ध व्यवसाय एकमेकांना पूरक ठरत आहेत.
कुटुंबाचा 'टीम वर्क' म्हणून सहभाग...
या यशात विशाल यांच्या पत्नी आणि वडिलांचा मोलाचा वाटा आहे. पहाटे दूध काढण्यापासून ते गोठ्याची स्वच्छता आणि चारा नियोजनापर्यंत सर्व कामे कुटुंबातील सदस्य मिळून करतात. यामुळे मजुरांवरील खर्च कमी झाला असून, व्यवसायात पारदर्शकता आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
दैनंदिन १५० लिटर दुधाचा टप्पा
विशाल यांच्या गोठ्यात आज १२ दुभत्या गायी आणि ८ लहान वासरे आहेत. योग्य पशुखाद्य, वेळेवर लसीकरण आणि जनावरांची वैयक्तिक निगा यामुळे आज त्यांच्या गोठ्यातून दररोज सरासरी १५० लिटर दूध संकलित होते. सध्या दुधाला ३७ ते ३८ रुपये प्रति लिटर दर मिळत असून, खर्च वजा जाता त्यांना शहरात मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक आणि शाश्वत उत्पन्न मिळत आहे.
ग्रामीण तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता सरकारी योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय उभारला पाहिजे. नियोजन आणि चिकाटी असेल तर शेतीमध्ये शहरापेक्षा जास्त पैसा आणि समाधान दोन्ही आहे. - विशाल परकाळे, दुग्ध व्यावसायिक.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
