नवनाथ जगदाळे
दहिवडी : माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा विविध फळबागांत हातखंडा आहे. तसेच तालुक्यात डाळिंबाचीशेतीही विस्तारत आहे.
अशाच प्रकारे बिदाल येथील प्रगतशील बागायतदार सतीश किसन ढोक यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले. तसेच युरोपच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाच्या डाळिंबाच्या जोरावर दबदबा निर्माण केला आहे.
१० वर्षांपासून त्यांची डाळिंबे निर्यात होत आहेत. विशेष म्हणजे एका हंगामात त्यांनी ९५ लाखापर्यंत उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांपुढे एक आदर्शही निर्माण केला आहे.
बिदाल येथील सतीश ढोक यांनी २००१मध्ये सुरुवातीला डाळिंबीची ३०० झाडे लावली होती. कमी पाणी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. दुष्काळात टँकरने पाणी आणून फळझाडे जगवली होती.
त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी या फळबागेची माहिती घेतली व विषमुक्त डाळिंब तयार करण्याचा संकल्प केला.
सेंद्रिय खताचा वापर करून त्यांनी वेळोवेळी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन घेतले. १० वर्षांपासून त्यांची डाळिंब युरोपच्या बाजारपेठेमध्ये निर्यात होत आहेत.
युरोपमध्ये मोठी मागणी..
◼️ सतीश ढोक हे डाळिंबाची विशेष काळजी घेतात. संपूर्ण फळबाग झाकण्यात येते. यामुळे त्यांना औषधावरचा खर्चही कमी आला आहे.
◼️ योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्याने फळांचा आकारही मोठा होतो. तसेच क्वालिटी चांगल्या प्रकारे राहते.
◼️ त्यामुळे अशा डाळिंबाला युरोपच्त्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.
◼️ शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी डाळिंब चांगल्या पद्धतीने जोपासले आहे.
◼️ तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असतानाही त्यांनी बागेला जिवापाड जपले होते.
◼️ आजही त्यांच्याकडे अनेक शेतकरी डाळिंबाची माहिती घेण्यासाठी येत असतात.
यशाबद्दल गौरव
◼️ या यशाबद्दल २०१९ मध्ये डाळिंब क्षेत्रातील सर्वोच्च असणारा आय एन एक्सपोर्ट पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
◼️ सन २०२५ मध्ये सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने अनार गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
◼️ याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
अधिक वाचा: जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून माण तालुक्यातील 'या' म्हैशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
