राहिद सय्यद
लोणंद : बदलत्या हवामान परिस्थितीत शेती करणे मोठे आव्हान असताना योग्य नियोजन, अनुभव आणि निसर्गाशी संवाद साधत दर्जेदार फळबाग उत्पादन घेता येते.
पाडेगाव, ता. खंडाळा येथील निंबूत मळ्यातील प्रगतिशील शेतकरी दीपक जगताप यांनी आपल्या अंजीर बागेच्या माध्यमातून सिद्ध करून ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
दीपक जगताप यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी शेतीत प्रयोगशीलता जपली.
जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून अंजीर लागवडीवर भर दिला. सुरुवातीला कमी लागवड करून अनुभव घेतला गेला.
त्या अनुभवाच्या जोरावर लागवड पद्धत, छाटणी, खत व सिंचन व्यवस्थापनात सातत्याने सुधारणा करत आज अंजीर शेतीचा एक शाश्वत व व्यावसायिक नमूना उभा राहिला आहे.
खट्टा अन् मीठा बहर
◼️ अंजीर बागेत खट्टा व मीठा या दोन्ही बहरांचे काटेकोर नियोजन केले जाते.
◼️ छाटणी ही झाडांच्या अवस्थेनुसार आणि हवामानाचा अंदाज घेऊन केली जाते.
◼️ छाटणीनंतर साधारण चार महिन्यांनी फळधारणा सुरू होते.
◼️ योग्य बहर नियोजनामुळे वर्षातील ७ ते ८ महिने अंजीर उत्पादन मिळते.
◼️ त्यांच्याकडे चार एकर क्षेत्र आहे.
कीड रोग नियंत्रण
◼️ बागेचे नियमित निरीक्षण केले जाते. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास निंबोळी अर्क, शिफारशीत रासायनिक औषधांचा वापर होतो.
◼️ पावसाळ्यात रोगांचा धोका वाढत असल्याने प्रतिबंधात्मक फवारणीवर भर दिला जातो.
सिंचन अन् खत व्यवस्थापन
◼️ बागेत ठिबक सिंचनासोबत पाटपाणी या दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो.
◼️ दर आठ दिवसांनी ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
◼️ पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आच्छादनाचा वापर केला जातो.
◼️ एकूण व्यवस्थापनात ७० टक्के सेंद्रिय आणि ३० टक्के रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो.
◼️ जिवामृत, निंबोळी अर्क आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे झाडांची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते.
उत्पादन, विक्री अन् उत्पन्न
◼️ सध्या अंजीर काढणी हंगाम सुरू असून प्रतिदिन २५० ते ५०० किलोपर्यंत उत्पादन मिळते.
◼️ वार्षिक सरासरी १४ ते १६ टन उत्पादन होते.
◼️ फळांची प्रतवारी व पॅकिंग बागेतच केले जाते.
◼️ कोल्हापूर, हुबळी, बेळगाव, बंगळुरू तसेच आसपासच्या मॉलमध्ये थेट विक्री केली जाते.
◼️ बाजारभाव ५० ते १०० रुपये प्रतिकिलो दरम्यान असतो.
◼️ एकरी खर्च नियंत्रणात राहतो आणि या अंजीर बागेतून वार्षिक ६ ते ७ लाख रुपयांचे व्यावसायिक उत्पन्न मिळते.
शेती बदलत्या वातावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाचा अभ्यास करून शेती करावी. उत्पादनाबरोबरच मार्केटिंगलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. अनुभव, नियोजन आणि निसर्गाशी सुसंवाद साधत उभी राहिलेली ही अंजीर शेती आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. - दीपक जगताप, शेतकरी
अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?
