लक्ष्मण सरगरआटपाडी : दुष्काळी फोंड्या माळरानावर शेतीमध्ये विविध प्रयोग करत तैवान पिंक प्रजातीच्या सात हजार पेरूच्या झाडांच्या लागवडीमधून सुमारे १५० टन उत्पादन घेणारे पांडुरंग लेंगरे हे यशस्वी शेतकरी बनले आहेत.
उत्तम व्यवस्थापन, योग्य काळजी व शेतीमध्ये वाहून घेत त्यांनी कोट्यधीश होण्याचा बहुमान पटकावला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी साकारलेली बनगरवाडी या कादंबरीतून याच लेंगरेवाडी गावचे दुष्काळी परिस्थितीमुळे झालेले विदारक वास्तव मांडले होते.
याच लेंगरेवाडी गावात सध्या टेंभू योजनेचे पाणी आले आहे. परिणामी सध्या शेतीची परिस्थिती बदलत चालली आहे. पांडुरंग लेंगरे या शेतकऱ्याने उत्तम शेती व्यवस्थापनातून सात एकरमध्ये सुमारे पाच हजार तैवान पिंक ही पेरूची झाडे लावली आहेत.
सध्या चौथे वर्ष असून, दरवर्षी साधारणपणे १५० टन उत्पादन मिळेल. जागेवरच फळबागेत व्यापारी माल घेऊन जातात. साधारणपणे ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
एका झाडाला सरासरी शंभर फळे येतात. वजन ६० किलोपर्यंत होते. तैवान पिंक या पेरूच्या प्रजातीला लागवडीपासून सहा महिन्यानंतर फलधारणा सुरू होते.
याची लागवड लेंगरे यांनी बारा बाय पाच अशी केली आहे. एकरी लागवड खर्च ८० हजार आला असून, पेरूची लागवड केल्यानंतर पुढे १५ वर्षे पीक घेता येते.
पांडुरंग लेंगरे यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शेतीवर लक्ष केंद्रित असून, त्यांची दोन मुले, पत्नी, आई व वडील हे बारकाईने पळपिकाकडे लक्ष देतात.
त्यांची डाळिंब व पेरू हे दोन फळपीक घेण्याकडे कल असतो. हमखास पैसे मिळवून देणारे व कमी मेहनतीचे पेरू पीक असल्याने घरातील सर्व सदस्य हे मजुरांच्या सहाय्याने उत्तम शेती करत आहेत.
९० लाखांचे उत्पन्नआतापर्यंत त्यांची सुमारे १५० टन पेरूची विक्री झाली आहे. अजून तोडणी सुरूच आहे. सरासरी ३५ रुपये दराप्रमाणे दरवर्षी ८० ते ९० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती प्रगतशील शेतकरी पांडुरंग लेंगरे यांनी दिली.
अधिक वाचा: काय सांगताय! अवघ्या २९ मिनिटात भिजतेय १ एकर ऊस शेती; काय आहे तंत्रज्ञान? वाचा सविस्तर