बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले नाही. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्याने पालवीचे प्रमाण जास्त होते. थंडी सुरू झाल्यावर मोहर प्रक्रिया सुरू झाली, तर डिसेंबरमधील थंडीने फुलोरा चांगला होता.
मात्र, थंडीचे प्रमाण वाढले अन् पुनर्मोहर सुरू झाल्याने मोहर झडून गेला, फळगळ सुरू झाल्याने आंबा पिकाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
फळगळ कशामुळे आणि कसे कराल नियंत्रण?
१) फळमाशी नियंत्रण
◼️ आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळे गळून पडतात.
◼️ अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळे वेळीच गोळा करून नष्ट करावीत.
◼️ तसेच आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर २ या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत.
२) फळगळ आणि साका
हापूस आंबा पिकामध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी व साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एन् ऐटका (nATCA १० टक्के) आणि फॉलिक अॅसिड (०.२० टक्के) घटक असलेल्या द्रावणाची फवारणी अनुक्रमे ५० टक्के मोहर फुलल्यावर (१ मिली/लि.), फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर (१.५ मिली/लि.), फळाचा आकार अंडाकृती झाल्यावर (२ मिली/लि.) करावी.
३) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती असताना फवारणी
◼️ आंबा पिकामध्ये मोहोर आल्यानंतर फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना १% पोटॅशियम नायट्रेट (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याच्या तीन फवारण्या कराव्यात.
◼️ पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचे वजन व आकार वाढण्यास मदत होते तसेच फळांची गुणवत्ता सुधारते.
◼️ यामुळे साखर व आम्लता यांचे प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतील गराला आकर्षक रंग प्राप्त होतो.
◼️ याशिवाय फळांचा टिकाऊपणा वाढतो व फळातील साक्याचे प्रमाण कमी होते.
४) पाणी व्यवस्थापन
◼️ आंबा पिकात फळधारणा झालेली असल्यास आणि पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेता, जेथे उपलब्ध व शक्य आहे तेथे प्रति झाडास १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. अशाप्रकारे ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
◼️ मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही.
अधिक वाचा: केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना?
