वनशेती ही अशी भू-व्यवस्थापन प्रणाली आहे ज्यामध्ये हंगामी व बारमाही पिकांबरोबर फायदेशीर झाडांचे शेतीमध्ये वैविध्यपूर्ण मिश्रण करून उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला जातो.
वनशेतीच्या विविध पद्धती आहेत ज्या जमिनीच्या प्रतिनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त असतात.
त्यामधून चारा, जळावू लाकूड, शेती अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघु-वन उपज मार्फत शेतकरी त्याचे उत्पन्न वाढवू शकतो. सध्याच्या परिस्थितिमध्ये वनशेती ही एक शाश्वत आणि हुकमी उत्पन्नाचे साधन म्हणून वेगाने प्रसारित होत आहे.
वनशेतीचे फायदे
- वनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा, लाकूड, फळे व लघु-वन उपज असे भरपूर फायद्या सोबत शाश्वत उत्पन्नाची हमी शेतकऱ्याला मिळते.
- दिवसेंदिवस शेतमजुरांच्या कमी होत चाललेल्या उपलब्धतेमुळे शेतकरी बहुवार्षिक पिकांकडे आकर्षित होऊ लागला आहे. जसे की साग, चिंच, बांबू व जांभूळ ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न घेत आहे.
- वाढत्या क्षारपड, मुरमाड व पडीक जमिनी वरती वनशेती नुसती फायदेमंद ठरत नाही तर या जमिनींचा पोत व कर्ब वाढवून त्याचा फायदा पिकांना होतो.
- हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी विशेषत: उन्हाळ्यामध्ये वनशेती उपयुक्त ठरते. यामध्ये हिरवा चाऱ्यासाठी सुबाभूळ, अंजन, शेवरी, काटेरी बाभुळ, शिरस, खैर, आपटा, कांचन, पांगारा, धावडा, नीम, निंबारा, पळस, हादगा इ. वृक्ष फायदेशीर ठरतात.
- याव्यतिरिक्त वनशेतीमुळे जमिनीची धूप थांबवणे, सुपीकता वाढवणे, आर्द्रता टिकवणे, वादळी वाऱ्यांपासून संरक्षण देणे आणि वातावरण बदलाबरोबर संतुलन राखले जाते.
- आज देखील खेड्यातली ७०% पेक्षा जास्त जनता ही इंधनासाठी लाकडावरतीच अवलंबून आहे. जळणासाठी निलगिरी, बाभूळ, वेडीबाभूळ, सुरू, पळस, साग, नीम, आवळा, करंज, हादगा, शेवरी, विलायती चिंच इ. चा वापर केला जातो.
- काही वृक्ष लाकूड, फळे, चारा याशिवाय लघु वन उपज जसे की मोहाची फुले आणि बिया, बिडी बनवण्यासाठी तेंदूची पाने, डिंक (पळस, बाभुळ), पत्रावळी व द्रोण (पळस, वड, बेहडा), दोर (अंजन व घायापत), लाख (पळस, बोर व कुसुम), रेशीम (तुती, अर्जुन), जैविक इंधनासाठी (मोह, उंडी, बिब्बा, कडूलिंब, करंज) विविध बहूउपयोगी वृक्षांची लागवड केली जाऊ शकते.
- हस्त कला, खेळणी व विणकाम यासाठी सागवण, आंबा, वेत, बांबू, बाभुळ, काटे शेवरी, पळस व नाना यांसारख्या वृक्षांची गरज भासते.
- औद्योगिक उद्योगांमध्ये (कागद व प्लायवूड उद्योग) निलगिरी, साग, शिवण, सुबाभुळ, सुरु, मेलीया डुबिया, बांबू व महोगणी इ. जलद वाढ होणाऱ्या वृक्षांची शेती केली जाऊ शकते.
- जागतिक बाजारपेठेमध्ये जास्त मागणी असलेल्या प्रजाती जसे की चंदन, रक्त चंदन, रोसेवूड, नरक्या या सारख्या विलुप्त होणाऱ्या वृक्षांची लागवड शास्त्रीयदृष्ट्या करून जास्त उत्पन्न देखील मिळवले जाऊ शकते.
अधिक वाचा: खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर
- भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था
माळेगांव, बारामती