कपाशीच्या पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूची पाने खाणारी अळी) या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागात देखील कमी अधिक प्रमाणात कपाशीवर ही कीड आढळून येत असून, या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे.
विभागात यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार विभागात १० लाख ९२ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित असताना १० लाख ३९ लाख ५०९ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली. वारंवार अतिवृष्टी झाल्याने आधीच शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च दुप्पट झाला.
त्यामुळे खर्चसुद्धा निघेल किंवा नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना आता भेडसावत आहे. बहुतांश भागातील कपाशी पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूची पाने खाणारी अळी) या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही अळी दिवसा पिकावर दिसून येत नाही.
मात्र, रात्रीच्या सुमारास पिकाचे नुकसान करते. या किडीच्या नियंत्रणासाठी पीडीकेव्हीचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डी. बी. उंदीरवाड यांनी शेतकऱ्यांना उपाययोजनाही सुचविल्या आहेत.
अळीमुळे असे होते कपाशीचे नुकसान ?
या किडीने पुंजक्यात घातलेल्या अंड्यांमधून लहान लहान अळ्या समूहात बाहेर येतात व प्रथमतः त्याच पानातील हरितद्रव्य मागील बाजूने राहून खातात. पाने जाळीदार होतात. या अळ्या नंतर मोठ्या होऊन स्वतंत्रपणे पाने, शेंडे, फुले, पात्या व बोंडे पोखरून खातात. परिणामी, उत्पादनात मोठी घट येते.
असे करा व्यवस्थापन
• शेतात हेक्टरी १५ ते २० पक्षी थांबे लावावेत.
• अंडी व अळीग्रस्त पाने तोडून किडीसह नष्ट करावीत.
• प्रादुर्भावाच्या सर्वेक्षणाकरिता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.
• सापळ्यामध्ये प्रति दिन ८ ते १० पतंग २ ते ३ दिवस आढळल्यास नियंत्रणासाठी उपायोजना करावी.
• सापळ्यातील अळीचे पतंग रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
याशिवाय आर्थिक नुकसान पातळी (५ टक्के पाते, फुले व बोंडांचे नुकसान) दिसून येताच क्लोरेंट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ६० मिली प्रति एकर किंवा स्पिनोटोरम ११.७० टक्के एससी २०० मिली प्रति एकर किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी ३७५ मिली प्रति एकर किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के ईसी सायपरमेथ्रीन ५ टक्के ईसी ४०० मिली प्रति एकर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.