करटुले लागवड तंत्र या भाग १ आणि २ मध्ये आपण करटुले या भाजीपाला पिकाची ओळख, पोषणमूल्ये, औषधी उपयोग, लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान, लागवडीची वेळ, शाकीय व बियाणांद्वारे लागवड तंत्र, खते, पाणी व्यवस्थापन व परागीभवन यासंबंधी सविस्तर माहिती पाहिली.
आजच्या अंतिम भागात आपण पाहणार आहोत कीड व रोग व्यवस्थापन, फळांची तोडणी, उत्पादनाचे प्रमाण आणि करटुले शेतीचा एकूण सामाजिक व आर्थिक उपयोग.
करटुले पिकांतील कीड व रोग व्यवस्थापन
प्रकार | कीड / रोग | लक्षणे | नियंत्रण उपाय |
कीड | इपिलाक्ना बीटल (Epilachna vigintioctopunctata) | पाने कुरतडली जातात, जाळीसारखी दिसतात | इमामेक्टिन बेंझोएट 5% SG @ 200 ग्रॅ./हेक्टर फवारणी |
| फळमाशी (Bactrocera cucurbitae) | फळांवर डाग, आतील भाग कुजणे | कीटक सापळे, खराब फळे नष्ट करणे, क्विनालफॉस 25 EC @ 2 मि.ली./लिटर फवारणी |
| नेमाटोड | मुळे सुजणे, झाडाची वाढ खुंटणे | जमिनीत निंबोळी पेंड मिसळणे, झेंडूचे आंतरपीक घेणे |
रोग | पावडरी मिल्ड्यू | पानांवर पांढऱ्या पावडरीसारख्या डागांचा थर | हेक्साकोनाझोल 5 EC @ 50–75 ग्रॅ./हेक्टर फवारणी |
| डाऊनी मिल्ड्यू | पानांवर पिवळसर डाग, मागील बाजूस करडा थर | डिथेन एम-45 @ 1.5 ग्रॅ./लिटर फवारणी |
| अँथ्रॅक्नोज | पानांवर व फळांवर तपकिरी ठिपके | डिथेन एम-45 किंवा हेक्साकोनाझोल फवारणी |
| पानांवरील डाग (Leaf Spots) | पानांवर काळे/तपकिरी डाग | योग्य बुरशीनाशकाची फवारणी |
| मोज़ेक (Virus) | पानांवर चट्टे, पानांचा आकार बिघडणे | संक्रमित झाडे उपटून नष्ट करणे, वहन करणाऱ्या कीडांवर इमिडाक्लोप्रिड 17.8% SL @ 4 मि.ली./10 लिटर किंवा क्विनालफॉस 25 EC @ 2 मि.ली./लिटर फवारणी |
तोडणी व उत्पादन
• कंदांपासून लागवड केल्यास : लागवडीनंतर ४० - ५० दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात.
• खोडाच्या कलमांद्वारे लागवड केल्यास : ६० - ७० दिवसांनी पहिली तोडणी करता येते.
• बियांद्वारे लागवड केल्यास : ६५ - ७५ दिवसांचा कालावधी लागतो.
तोडणीसाठी योग्य अवस्था
• फळे मऊ, कोवळी, हिरव्या रंगाची असावीत. आतल्या बिया मऊ असाव्यात.
• पूर्णपणे पिकलेली फळे नारिंगी रंगाची असतात आणि त्यातील गर लालसर व बिया कठीण होतात.
• बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन हाताने फळांची तोडणी करावी.
करटुले शेतीचे उत्पादन
• कंदांपासून लागवड केल्यास : ४० - ५० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळते.
• बिया/खोडाच्या कलमांपासून लागवड केल्यास : पहिल्या वर्षी २० - २५ क्विंटल/हेक्टर अल्प उत्पादन मिळते कारण अन्नद्रव्यांचा वापर कंद विकासासाठी होतो.
• त्यानंतर मात्र पुढील वर्षांत उत्पादन अधिक वाढते.
एकत्रित सारांश
• करटुले हे भाजीपाला पीक नैसर्गिक पोषण व औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे. पारंपरिक ज्ञानानुसार याचा उपयोग मधुमेह, पोटदुखी, डोकेदुखी, व विषारी दंशांवर होतो.
• उष्णकटिबंधीय हवामानाशी सुसंगत असल्यामुळे करटुले हे पीक ग्रामीण व आदिवासी भागांतील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन ठरू शकते.
• यामध्ये बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारख्या पोषक घटकांचे प्रमाण मुबलक आहे.
• जर ग्राहकांमध्ये याबाबत जागृती झाली तर याला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण होऊ शकते.
• करटुलेची साठवणक्षमता अधिक असल्याने वाहतूक सुलभ होते व देशांतर्गत व निर्यात बाजारातही संधी वाढतात.
• वाढती मागणी लक्षात घेता करटुले शेतीचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळविता येऊ शकतो.
डॉ संतोष चव्हाण
विषय विषेशज्ञ (उद्यान विद्या)
डॉ प्रवीण चव्हाण
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार)
संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी नांदेड.