Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र

रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र

Learn modern cultivation techniques that give higher yields of dryland and irrigated gram in the Rabi season | रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र

रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र

हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते.

हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते.

शेअर :

Join us
Join usNext

हरभरा हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे आणि व्यापक प्रमाणावर घेतले जाणारे कडधान्य पीक आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असून, पोषणमूल्याच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त आहे. हरभऱ्याचा उपयोग डाळ, फुटाणे, चण्याचे पीठ, हरभऱ्याच्या भाजीपासून ते पशुखाद्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो.

यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही मोठी भर पडते. महाराष्ट्रातील विविध agro-climatic zones मध्ये हरभऱ्याची लागवड केली जाते विशेषतः रब्बी हंगामात. मात्र यशस्वी उत्पादनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करणे आवश्यक आहे.

हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीत हरभरा घेतला जातो मात्र दोन्ही ठिकाणी लागवडीच्या पद्धती व व्यवस्थापनात थोडा फरक असतो.

पेरणीपूर्वीची मशागत, योग्य पेरणीचा कालावधी, योग्य प्रमाणात वाणांची निवड व खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तसंच कीड व रोग नियंत्रण, तण व्यवस्थापन व आंतरपीक घेण्याची योग्य पद्धत वापरल्यास शेती अधिक फायदेशीर होते.

शेती विज्ञानातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, योग्य सल्ला, जमिनीची तपासणी व स्थानिक हवामानाचा अभ्यास करून हरभरा लागवड केल्यास अधिक उत्पादन व आर्थिक लाभ मिळवता येतो. अशा पद्धतीने सुधारित लागवड तंत्रज्ञान अंगीकारल्यास हरभरा हे पीक केवळ पोषणपूरकच नव्हे तर शाश्वत शेतीचा एक महत्त्वाचा भाग ठरते.

जमीन व हवामान

हरभऱ्याची लागवड मध्यम ते भारी, निचऱ्याची क्षमता असलेल्या सुपीक जमिनीत करावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हरभऱ्याची लागवड टाळावी. तसेच कोरडवाहू परिस्थितीत जमिनीची कमीत कमी मशागत करावी. हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान मानवते; मात्र फुलोऱ्याच्या काळात ढगाळ हवामान व धुक्यामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो.

पूर्व मशागत

खरीप पिकानंतर एक खोल नांगरणी व दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी पद्धत

कोरडवाहू पेरणी १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान करावी. तर बागायती पेरणी २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. तसेच हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेरणी उशिरा केल्यास दाणे पूर्ण भरत नाहीत.

दरम्यान हरभरा लागवड करतांना हेक्टरी ३.३३ लाख झाडे ठेवण्यासाठी ओळीत ३० सेमी व झाडामध्ये १० सेमी अंतर ठेवावे. तसेच बागायतीसाठी ओळीतील अंतर ४५ सेमी व झाडातील अंतर १० सेमी ठेवावे.

यासोबत बियाणे ७-१० सेमी खोलवर व ओलित पडेल याची खात्री करावी. तसेच सऱ्या वरंबा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन चांगले येते.

बियाण्याचे प्रमाण

• लहान दाणे : ५०-६० किलो/हे.
• मध्यम दाणे : ७५-८० किलो/हे.
• काबुली वाण : १००-१२५ किलो/हे.

बीज प्रक्रिया

हरभरा उगवणीनंतर साधारणतः एक महिन्यापर्यंत मुळकुजव्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे मरतात. त्यानंतर पुढील टप्प्यात फ्युसेरियम बुरशीमुळे होणाऱ्या मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे झाडे पूर्णपणे वाळतात.

त्यामुळे हरभऱ्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपवस्थेतील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम, कॅप्टन किंवा बाविस्टीन यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यासोबत ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो बियाणे प्रमाणे मिसळून प्रक्रिया करावी.

बुरशीनाशक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिवाणू संवर्धन युक्त प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्वी १० ते १५ किलो हरभरा बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे एक पाकीट गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बियाण्यावर चोळावे. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. या प्रक्रियेमुळे जमिनीत अतिरिक्त नत्र साठवले जाते व उत्पादनात १० ते १५  टक्क्यांनी वाढ होते.

तसेच स्फुरद खताची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रति १० किलो बियाण्यावर पीएसबी (फॉस्फो-सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया) जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम प्रमाणात वापरावा.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी कोरडवाहू हरभऱ्यास हेक्टरी २० किलो नत्र आणि ३० किलो स्फुरद जमिनीत मिसळून द्यावे. तर ओलिताखालील हरभऱ्यास २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. काबुलीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र आणि ६० किलो स्फुरद दिल्यास उत्पादनात वाढ होते. हरभरा पिकाला माती परीक्षणानुसार पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी हेक्टरी ३० किलो पालाश, २५ किलो झिंक सल्फेट आणि २० किलो गंधक दिल्यास उत्पादनात वाढ मिळते.  

कोरडवाहू हरभऱ्याच्या पिकावर दोन टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति दहा लिटर पाणी ) किंवा दोन टक्के डीएपी (२०० ग्रॅम डीएपी प्रति दहा लिटर पाणी) द्रावणाच्या दोन फवारण्या पहिली फुले येण्यापूर्वी व त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. 

उत्पादनात वाढ होण्यासाठी ओलीता खालील पिकास पेरणीपूर्वी ५ टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे किंवा पेरणीच्या वेळी जमिनीतून प्रति हेक्टरी दोन ते तीन टन गांडूळ खत आणि शिफारशीनुसार रासायनिक खत २५:५०  नत्र आणि स्फुरद/हेक्टरी याप्रमाणे द्यावे. 

तन व्यवस्थापन

या पिकास पहिली कोळपणी आणि खुरपणी पेरणी पासून २५ दिवसांनी व दुसरी ४५ दिवसांनी करावी. आंतरमशागत पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी संपवावी. तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेंडीमेथिलीन २.५ ते ३ लिटर प्रति हेक्टरी हरभरा पेरणीनंतर परंतु बियाणे उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी. पहिल्या ३० दिवसापर्यंत  पिक तन मुक्त ठेवल्यास उत्पादनात २५ टक्के वाढ होते. 

आंतर पीक

हरभरा पिकाचे मोहरी, करडई, जवस, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सेंटिमीटर अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळते. 

पाणी व्यवस्थापन

हरभऱ्याचे पीक पाण्याच्या वापरास उत्तम प्रतिसाद देते. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण व पीक अवस्था लक्षात घेऊन पाणी द्यावे. हलक्या जमिनीत हरभरा घेतला असल्यास पेरणीनंतर २५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या तीन पाळ्या द्याव्यात. कोरडवाहू हरभरा  पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक पाणी दिल्यास उत्पादनात २८ टक्के वाढ होते. तसेच दोन पाणी दिल्यास ५० टक्के वाढ होते.

बागायती हरभऱ्यास पेरणीचे वेळी दिलेल्या पाण्याशिवाय पहिले पाणी पीक ४५ दिवसाचे (फुलोऱ्यात) असताना आणि दुसरे पाणी ७५ दिवसाचे (घाटे भरतेवेळी) असताना पाणी द्यावे.

या पिकास जास्तीचे पाणी दिल्यास झाडाची काहीच वाढ जास्त होते व घाटे कमी लागतात जमिनीत पाणी साचून राहिल्यास पीक उधळण्याचा धोका असतो. हरभरा पिकास फांद्या फुटण्याच्या वेळेस, फुलोरा आणि घाटे भरणे या तीन संवेदनशील अवस्थेत पाणी देणे गरजेचे आहे. यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात भर पडते. 

सुधारित वाणांची निवड

• कोरडवाहू व ओलिताखालील वाण : विजय, दिग्विजय, जाकी, साकी, राजविजय २०४/२०२, फुले विक्रम, फुले विक्रांत, परभणी चना १६, पीकेव्ही कांचन, बीडीएनजी ७९७ (आकाश), विश्वराज. 

• काबुली वाण (ओलिताखाली) : विराट, पीकेव्ही काक २, श्वेता, पीकेव्ही काबुली ४, फुले कृपा, बीडीएनजीके ७९८. 

• हिरव्या हरभऱ्यासाठी : हिरवा चाफा, पीकेव्ही हरिता, एके जीएस १. 

• फुटाण्यासाठी वाण : गुलक १, डी ८. 

प्रा. संजय बडे
प्रा. शिरगापुरे के. एच.

सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव
ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : यंदा रब्बी हंगामात 'या' सुधारित ज्वारी वाणांची लागवड ठरेल फायद्याची; हमी असेल अधिक उत्पादनाची

Web Title : रबी सीजन में अधिक उपज के लिए आधुनिक चना की खेती तकनीकें

Web Summary : अधिक उपज के लिए आधुनिक चना की खेती सीखें। उचित भूमि की तैयारी, बीज उपचार, उर्वरक और जल प्रबंधन बारानी और सिंचित फसलों दोनों के लिए महत्वपूर्ण हैं। अधिकतम लाभ के लिए नई तकनीकों और मिट्टी परीक्षण का उपयोग करें।

Web Title : Modern Chickpea Cultivation Techniques for Higher Yields in Rabi Season

Web Summary : Learn modern chickpea cultivation for higher yields. Proper land preparation, seed treatment, fertilizer, and water management are crucial for both rainfed and irrigated crops. Utilize new technologies and soil testing for maximum profit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.