Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असून वादळी वारा, पाऊस आणि तापमानात चढ-उतार दिसत असून याचा थेट परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून पीक व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. (Crop Safety)
योग्य सल्ला व व्यवस्थापनाद्वारे या बदलांचा प्रभाव कमी करता येईल. मराठवाड्यातील हवामानात येत्या काही दिवसांमध्ये बदल लक्षात घेऊन शेती कामांमध्ये आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, १६ मे या पर्यंत बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह (ताशी ४० ते ६० किमी) मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तापमानात बदल
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र किमान तापमानात १-२ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे. २२ मे पर्यंत पावसाची शक्यता सरासरी इतकी किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे, तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते.
पीक व फळबाग व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने हवामान परिस्थितीचा विचार करून पुढील कृषी सल्ला (Krushi Salla) दिला आहे.
* हळद पिकाची काढणी, उकडणे व पॉलीश करून गोदामात सुरक्षित साठवणूक करावी.
* काढणीस तयार असलेली उन्हाळी भुईमूग त्वरित काढावी व सुरक्षित ठिकाणी साठवावी.
* उशीरा पेरणी केलेल्या पिकांसाठी तुषार सिंचन वापरून पाणी व्यवस्थापन करावे.
फळबाग व्यवस्थापन
* केळीच्या झाडांना आधार देणे, घडांची काढणी करणे, तसेच आच्छादन करून मातीचे तापमान संतुलित ठेवणे.
* आंबा फळाची काढणी लवकर करावी. वादळामुळे पडलेली फळे व तुटलेल्या फांद्या गोळा करून विल्हेवाट लावावी.
* द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी १५ मेपूर्वी पूर्ण करावी आणि खत व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
* काढणीस तयार असलेल्या पिकांची तातडीने काढणी करून विक्री किंवा साठवणूक करावी.
* रसशोषक किडींसाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
फुलशेती
* फुलपिकांमधील तण नियंत्रण करावे व तयार फुले काढणी करून बाजारात पाठवावीत.
वादळी वाऱ्यांची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
* पिकांची व फळांची काढणी वेळेत करून सुरक्षित ठिकाणी साठवावी.
* वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकांना आधार द्यावा.
* बांधकाम साहित्य, शेड्स आणि यंत्रसामग्री सुरक्षित जागी ठेवावी.
(सौजन्य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Guava Pruning: पेरू बागांचे अधिक उत्पादनासाठी योग्य छाटणी तंत्र! वाचा सविस्तर