मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका, चाकवत, मुळा, राजगिरा, लेट्युस ही कमी कालावधीत येणारी भाजीपाला पिके आहेत. फक्त पुरवठा करणे हा या भाजीपाला पिकांच्या लागवडीचा उद्देश नसून त्यासोबत आहारातील त्यांच्या नियमित समावेशाने होणारे फायदेदेखील महत्वाचे आहेत.
भाजीपाला पिके आणि आहारातील महत्व
१) मेथी
मेथी त्वचेची लवचिकता वाढवते आणि वृध्दत्वाची चिन्हे कमी करते. मेथी पानांमधील फॅटी ऍसिडस आणि प्रथिन केसांना बळकट करते. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे. मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कमरेचे दुखणे दूर होते. शारीरिक शक्ती वाढते.
२) कोथिंबीर
कोथिंबीरीची पाने जठराची जळजळ कमी करून तेथील अंतः स्त्राव वाढवतात. कोथिंबीरने ताप कमी होतो, पित्त शमते, दृष्टिदोष कमी होतो. कोथिंबीर शीत गुणाची असुनही पाचक व रुची टिकवणारी आहे.
३) पालक
पालकाच्या पानांमध्ये कॅल्शियम असते. मज्जासंस्था, हदय आणि स्नायुंसाठी कॅल्शियम गरजेचे आहे. पालकामध्ये 'अ' जीवनसत्व असते दृष्टी कमजोर झाली असेल तर आहारात पालकाचा समावेश करा.
४) शेपू
शेपुची भाजी रेचक, पचायला हलकी आहे. शेपुच्या भाजीमुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.
५) आंबट चुका
पचायला कठीण असणाऱ्या पदार्थांबरोबर चुक्याची पाने वापरावीत, यामुळे अन्न पचनास मदत होते यात विपुल प्रमाणात कॅल्शियम, लोह असते.
६) चाकवत
चाकवत रुचकर, रक्तशोधक, दर्दनाशक, त्रिदोषशामक, शीतवीर्य, बलवर्धक आहे. चाकवत डोळे, लघवी व पोटासंबंधीच्या तक्रारीसाठी विशेष लाभदायक आहे.
७) मुळा
मुळा मूळव्याध, कफ, वायु, आतड्यांच्या रोग्यांसाठी उपयुक्त आहे. मुळ्याच्या पानांची भाजी तसेच रस काढून पितात. पचनशक्ती सुधारते, आतड्यातील जंतुंचा नाश होतो. मुत्रविकारामध्ये फार लाभदायी आहे. यकृत तसेच हृदयासाठी उपयुक्त. बद्धकोष्टता नाहीशी होते.
८) राजगिरा
राजगिरा पालेभाजी रक्तशुध्दीकरिता उपयुक्त आहे. गंडमाळा क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्ही मध्येही आहेत.
९) लेट्युस
लेट्युस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. लेट्युसच्या पानांचे सेवन निद्रानाशाची समस्या कमी करते. लेट्युसचे सेवन केल्यास शरिरातील पाण्याची कमतरता भरून निघते. लेट्युस वजन कमी करण्यात अधिक मदत करते. लेट्युस खाल्ल्याने स्नायु आणि चयापचय मजबूत होते.
अधिक वाचा: Shenkhat Vapar : शेतीमध्ये शेणखताचा वापर करण्यासाठी अनेक मर्यादा; जाणून घ्या सविस्तर