पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील प्रगतशील शेतकरी जालंदर उकिर्डे यांनी शेती पिकावर येणाऱ्या ब्लॅक थ्रिप्स यासाठी आपल्या कल्पक बुद्धीतून नवीन प्रयोग करत ब्लॅक थ्रिप्स घालण्यासाठी जुगाड केले असून, ते जुगाड करून शेतकऱ्याचे पिकाला येणाऱ्या ब्लॅक थ्रिप्स नाहीसे करून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकते. आपला पिकावर होणारा भरमसाट खर्च टळू शकतो.
या वेळी ब्लॅक थ्रिप्सविषयी उकिर्डे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की कुठल्याही औषधाने आटोक्यात न येणारा ब्लॅक थ्रिप्स साध्या मशीन ऑइलने आटोक्यात आणता येतो. फोटोत दाखविल्याप्रमाणे मल्चिंग पेपरवर कोणतेही मशीन ऑइल बाटलीत भरून, बाटलीच्या बुचला सुईने अगदी छोटे छिद्र पाडून ऑइल मल्चिंग पेपरवर मधोमध रेषेत पसरून टाका.
तसेच कमीत कमी ऑइल टाकून खोडाजवळ ऑइल जाणार नाही याची दक्षता घ्या, नाहीतर पीक नेस्तनाबूत होईल. ऑइल टाकताना शक्यतो सकाळी ९ ते १० या वेळेत आणि वारा नसताना टाका. कारण इतर वेळेस ब्लॅक थ्रिप्स तो एक तर जमिनीत किंवा रोपाच्या पानाआड लपलेला असतो. सकाळी वारा नसताना हा थ्रिप्स मल्चिंग पेपरवर सगळ्यात जास्त प्रमाणात आलेला असतो.
ऑइल टाकल्यानंतर १५ ते २० मिनिटांत असंख्य थ्रिप्स ऑइलला चिकटून मेलेले दिसतील. चार सहा दिवसांच्या अंतराने चार वेळा हा प्रयोग केल्यास या थ्रिप्सचा नक्कीच समूळ नायनाट होईल. हाच प्रयोग आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सतत केल्यास एकात्मिक कीड नियंत्रण होऊन तो हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
खरोखर जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे. जालंदर उकिर्डे यांनी केलेला प्रयोग हा सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. कारण कोणताही रोग पिकावर आला की त्या पिकाला वाचवण्यासाठी हजारो रुपये आपला खर्च होतो, पण उकिर्डे यांनी पिकावर येणाऱ्या ब्लॅक थ्रिप्स या रोगाचा अभ्यास करून चांगले जुगाड शोधले आहे. यामुळे शेतकऱ्याचा पिकावर होणारा भांडवली खर्च कमी होणार आहे. - शिरीष भोर, प्रगतशील शेतकरी.
२० मिनिटांत थ्रिप्स मेलेले दिसतील..
१५ ते २० मिनिटांत असंख्य थ्रिप्स ऑइलला चिकटून मेलेले दिसतील. चार दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा हा प्रयोग केल्यास या थ्रिप्सचा नक्कीच समूळ नायनाट होईल.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या