Join us

ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:42 IST

paddy crop advice सध्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे भात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे भात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे शेतकरी चिंतेत असून, भात पिकाची नियमित देखरेख आणि योग्य उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी कीड-रोग व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलण्याचे सुचवले आहे.

पिकाची काळजी आणि उपाययोजना१) पाण्याचा निचरा◼️ भात खाचरात साचलेले अतिरिक्त पाणी निचरा करावा.◼️ पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित ठेवावी.◼️ बांधबंदिस्ती करून पाण्याचा योग्य निचरा करावा आणि खाचरातील, तसेच बांधावरील तण काढून टाकावे.

२) किडींचे निरीक्षण◼️ भात पिकावर निळे भुंगेरे, सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.◼️ यासाठी खाचरात पाणी खेळते ठेवावे आणि प्रत्येक २-३ दिवसांनी पाणी बदलावे.◼️ या किडींच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५% प्रवाही) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा कारटॅप हायड्रोक्लोराइड (५०% प्रवाही) १.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.◼️ फवारणी पावसाची ६ तास उघडीप असताना करावी.

३) तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव◼️ सध्याचे वातावरण तपकिरी तुडतुड्याच्या प्रादुर्भावासाठी अत्यंत पोषक आहे.◼️ दाट लागवड, जास्त नत्र खतांचा वापर आणि खाचरात पाणी साठून राहणे यामुळे ही कीड वाढू शकते.◼️ रोपाच्या चुडात ५-१० तुडतुडे आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.◼️ नियंत्रणासाठी फिप्रोनिल (५% प्रवाही) २ मि.लि., इमिडाक्लोप्रिड (१७.८% प्रवाही) ०.२ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (२५% डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.◼️ फवारणी करताना पावसाची ३-४ तास उघडीप असावी आणि फवारा चुडाच्या बुंध्यावर पडेल याची काळजी घ्यावी.

४) खोडकिडीचे व्यवस्थापन◼️ खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास पुनर्लागवडीनंतर ५ % कीडग्रस्त फुटवे किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात एक अंडीपुंज आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.◼️ यासाठी शेतात २०-२५ मीटर अंतरावर २० कामगंध सापळे लावावेत.◼️ खोडकिडींच्या नियंत्रणासाठी अ‍ॅसिफेट (७५% पाण्यात विरघळणारे) ६२५ ग्रॅम, क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) १२५० मि.लि., कारटॅप हायड्रोक्लोराइड (५०% प्रवाही) ६०० ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५% प्रवाही) ५०० मि.लि. प्रति हेक्टरी फवारणी करावी.

महत्वाचेफवारणी करण्याआगोदर कोणती कीटकनाशके कशी घ्यायची? एकत्रित मिक्स करता येतील का? फवारणी कशी करता येईल यासाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

अधिक वाचा: राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार; आता मजबूत रस्ते तयार होणार

टॅग्स :भातपीककीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनहवामान अंदाजपाऊसपाणी