पूर्ववत सुरू असलेल्या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर केवळ शेती समृद्ध न होता शेतकरी कुटुंब देखील अर्थसंपन्न होते असे म्हणणं वावगे ठरणार नाही. शिऊर येथील भारत लक्ष्मणराव पाटील भोसले यांची यशोगाथा अशीच काहीशी रंजक आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या शिऊर या वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावचे भारत भोसले यांना वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. ज्यात गत दहा वर्षांपासून भारत कष्टाच्या संघर्षाची शेती करतात. मात्र यात हाती फार काही राहत नसल्याने अलीकडे २०१७ पासून भारत यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे.
यासोबतच २०२४ मध्ये त्यांनी ट्रॅक्टर व शेतमाल मळणी यंत्र देखील खरेदी केले आहे. ज्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध शेतमालाची मळणी देखील ते करून देतात. ज्यामुळे परिसरातील शेती कामांना वेग आला आहे. तर भारत यांच्या आर्थिक उत्पादनात देखील यामुळे वाढ झाली आहे.
सिंचन यंत्रणेने केले काम सोपे
भोसले यांच्या शेतात यंदा १ एकर कांदे, १.५ एकर मका, १ एकर गहू, १ एकर ज्वारी आहे. तर सर्व पिकांसाठी त्यांनी तुषार/ठिबक अशी सिंचन व्यवस्था केली आहे. ज्यामुळे पाणी देण्यासाठी शेतात थांबण्याची गरज भासत नाही. तसेच शेतातील लहान मोठ्या विविध कामी पत्नी उषा यांची देखील भारत यांना मोलाची साथ लाभत असल्याचे देखील ते सांगतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा मुक्त संचार गोठा
दुभत्या ४ गाई, ८ कालवडी, २ भाकड गाई असे एकूण १४ गुरे भोसले यांच्या गोठ्यात आहे. ज्यापासून दिवसाकाठी ३०-३५ लीटर दूध विक्री केले जाते. तर चारा कुट्टी करिता कुट्टी मशीन, दूध काढण्यासाठी यंत्र आदींचा वापर भोसले यांच्या गोठ्यात होतो.
शेतीला जोडधंदा असणे काळाची गरज
शेतकरी केवळ शेती एके शेती एवढेच काय ते करतात. मात्र आता पारंपरिक शेतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. एकवेळ या सर्वांतून मार्ग देखील निघतो मात्र पुढे बाजारात शेतकरी लुटल्या जातो. परिणामी शेती आणि शेतकरी दोन्हीकडे केवळ निराशा हाती येते. अशावेळी शेतकऱ्यांनी केवळ शेतीच्या आधारावर न थांबता शेती पूरक व्यवसायांची शेतीला जोड देणे गरजेचे आहे. - भारत लक्ष्मणराव भोसले, शेतकरी शिऊर.