भाताचे भरघोस उत्पादन येण्यासाठी भाताची रोपे निरोगी आणि जोमदार असणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध पद्धतीने भाताची रोपवाटिका तयार केली जाते.
त्याकरिता रोपे ही आवश्यकतेनुसार रोपवाटिकेमध्ये घेऊन ठराविक वयाची झाल्यानंतर त्यांची लागवड मुख्य शेतावर केली जाते. यात आपण चटई (मॅट) रोपवाटिकेविषयी सविस्तर माहिती पाहूया.
चटई (मॅट) रोपवाटीका कशी तयार करावी?
- या रोपवाटिकेसाठी आपण वाफे शेतामध्ये किंवा खळे अथवा शेडमध्ये पक्क्या जमिनीवरती सुध्दा करु शकतो.
- या रोपवाटिकासाठी १.२० मी. रुंदीचा व १०० गेजचा प्लास्टीकचा कागद वापरतात. एक गुंठा क्षेत्रावरती रोपवाटिका तयार करण्यासाठी साधारणपणे २.५ ते ३ किलो कागद लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लास्टीकला छिद्रे पाडावीत. सदर प्लास्टीक कागद ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटीका तयार करावयाची आहे अशा ठिकाणी पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विटा किंवा बांबूच्या सहाय्याने उचलून घ्याव्यात.
- अशा तयार झालेल्या वाफ्यामध्ये माती व शेणखत ६०:४० या प्रमाणात मिसळून ती एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि १ इंच उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या सहाय्याने ओतावी किंवा टाकावी. माती व शेणखत फ्रेममध्ये टाकण्यापूर्वी ५ मि.मी. च्या चाळणीमधून चाळून घ्यावी. त्यामुळे मातीमधील खडे वेगळे होतील.
- प्लास्टीक कागदावरती शेणखत मिश्रीत माती टाकून झाल्यानंतर हाताने/झारीने पाणी शिंपडून माती ओली करुन घ्यावी व हलकासा दाब द्यावा.
- अशा वाफ्यावरती रहू पध्दतीने म्हणजेच २४ तास पाण्यात भिजवून नंतर ३६ ते ४८ तास पोत्यामध्ये बियाणे ठेवून मोड आलेले बियाणे ५०० ग्रॅम प्रति चौ. मी. या दराने फेकून पेरावे व नंतर चाळलेल्या शेणखत मिश्रीत मातीने हलकेसे झाकावे.
- नंतर सुरवातीला २ ते ४ दिवस हाताने किंवा पंपाच्या सहाय्याने पाणी फवारून द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे.
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी चटई रोपवाटिकेत वी पेरण्यापूर्वी प्रति चौ.मी. ला १९ ग्रॅम डायअमोनियम फॉस्फेट द्यावे.
- अशा पध्दतीने पेरणी आणि व्यवस्थापन केल्यामुळे रोपे साधारण १२ ते १५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपांची संख्या जास्त असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही, जर झाल्यास हाताने तणे उपटून घ्यावीत.
- तयार झालेली रोपे रोपवाटिकेतून प्लास्टीक रोल करून किंवा हव्या त्या साईजमध्ये वाफे कापून मुख्य शेतावर जेथे लावणी करावयाची आहे अशा ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो.
- जर लावणी यंत्राच्या सहाय्याने करावयाची झाल्यास ८ इंच रुंदीच्या रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणी यंत्रात वापरता येतात.
- एक चौरस मीटरवरती घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेशी होतात, म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रासाठी १०० चौ. मी. क्षेत्र म्हणजेच एक गुठा क्षेत्र रोपवाटिकेसाठी पुरेसे आहे.
अधिक वाचा: भात पिकाची रोपे तयार करण्याची एकदम सोपी पद्धत कोणती? जाणून घ्या सविस्तर