Maharashtra Dam Storage : राज्यातून पावसाने माघार घेतल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निवडक भाग वगळता सर्वदूर पाऊस थांबला आहे. यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात..
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, केडगाव, वडज, डिंभे, घोड, पारगाव, सीना, खैरी, विसापूर ही धरणे १०० टक्के भरली. नाशिक जिल्ह्यातील दारणा, कडवा, करंजवण, गिरणा, हतनूर, वाघूर, मन्याड, उकई, पांझरा तर मुंबई उपनगरातील विहार, अप्पर वैतरणा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
तसेच पुणे विभागातील चासकमान, वीर, भाटघर, पवना या धरणासह मराठवाड्यासह नागपूर विभागातील उजनी, धोम, अलमट्टी, जायकवाडी, येलदरी, माजलगाव, तेरणा, मांजरा, तोतलाडोह, काटेपूर्णा, उर्ध्व वर्धा, अरुणावती ही धरणे काठोकाठ भरली आहेत. जवळपास ३९ मोठी धरणे संपूर्णतः भरली असून इतरही उर्वरित धरणांमध्ये ९८ टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा राज्यात मुबलक पाणीसाठा असल्याचे चित्र आहे.
काही धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच
दरम्यान पाऊस जरी थांबला असला तरी काही धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच आहे यामध्ये जायकवाडी धरणातून ७ हजार ३३६ क्युसेक, विष्णुपुरी धरणातून २७ हजार ६१६ क्युसेक, सीना कोळेगाव धरणातून १० हजार ४०० क्युसेक, गंगाखेड परभणी धरणातून ५५ हजार ९७४ क्युसेक, नांदेड जुना पूल येथून २९ हजार २०५ क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.
तसेच हातनुर धरणातून ६ हजार ९३० क्युसेक, गिरणा धरणातून ०३ हजार ४१४ क्युसेक, सारंगखेडा तापी येथून ८ हजार २९६ क्युसेक, सीना धरणातून २ हजार १६८ क्युसेक, राजापूर बंधारा धरणातून २८ हजार १११ क्युसेक, अलमट्टी धरणातून १ लाख ९८८ क्युसेक, गोसीखुर्द धरणातून २० हजार ३४१ क्युसेक, महागाव प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यातील धरणातून ०१ लाख १३ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे
- इंजि. हरिश्चंद्र.र.चकोर जलसंपदा (से.नि), संगमनेर.