देशभरात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे ३५० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इस्मा यांच्या अंदाजानुसार, केंद्र शासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, आगामी हंगामात तयार होणाऱ्या अतिरिक्त २५ ते ३० लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीस केंद्राने तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले, की शेतकरी आजकाल एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. ऊस हे नैसर्गिक आपत्तींमध्येही टिकून राहणारे शाश्वत पीक आहे.
देश आणि राज्य पातळीवर ऊस लागवडीत पुढील वर्षी नक्कीच वाढ होईल. यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र विस्तारामुळे राज्य देशातील साखर उत्पादनात अव्वल राहील, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात सध्या १२.५० लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. यातून अंदाजे ११० ते ११५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ ते ३० लाख मेट्रिक टनाने जास्त असेल, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी हंगामासाठी केंद्र शासनाने १०५० कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले आहे. इथेनॉल आणि साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी महासंघाने केंद्राकडे केली असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा अपेक्षित आहे.
इथेनॉल कोट्यात ८ टक्के वाढीचे स्वागत
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार, आगामी हंगामासाठी काढलेल्या इथेनॉल टेंडरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढ करून साखर उद्योगासाठी ६५० कोटी लिटर इथेनॉलचा कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वागतार्ह निर्णयाचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले आहे.
इथेनॉल भाव वाढल्यास शेतकऱ्यांना फायदा
इथेनॉलचे भाव वाढल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, त्यामुळे केंद्राने इथेनॉलचे भाव वाढवणे अत्यावश्यक आहे, असे मत पाटील यांनी नोंदवले.
अधिक वाचा: गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य