साप्ताहिक सुटीसह संक्रांतीच्या सणामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज गुरुवारपासून (दि. १६) पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
कांदा आवकेचं माहेरघर असलेल्या येथील बाजार समितीचे कामकाज गेल्या शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुटीसह सोमवारी भोगी, मंगळवारी संक्रांत व बुधवारी कर असल्यामुळे सलग पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आले होते.
परिणामी, या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी आज, गुरुवारपासून (दि. १६) पूर्ववत लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी दिली.
चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल कांदा व मका मालाची प्रतवारी करून बाजार विक्रीस आणावा, असे आवाहन समितीने केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लाल व पोळ कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने नियमितपणे लिलाव सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात आवक दिसून येत होती. त्यामुळे पाच दिवसांच्या सुटीनंतर गुरुवारी मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक