लक्ष्मण कांबळे
कुईवाडी : सोलापूर जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत उडीद खरेदी योजना गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याजवळ उत्पादित केलेला उडीद विकल्यानंतर आता त्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांची मनं आता सुन्न झाल्याचे दिसून येत आहे.
हे म्हणजे शासनाकडून जखमेवर मीठ चोळण्यासारखे झाले असून, शेतकऱ्यांनी आपल्याजवळील उत्पादित उडीद विकल्यानंतर त्याचा भाव वाढल्याचे समोर आले.
बाजारात उडीदाला आता आठ हजार शंभर रुपयांचा दर मिळत असताना देखील उडीदाची आवक शेतकऱ्यांकडून कमी झाल्याची दिसून येत आहे.
खरिपाबरोबरच रब्बी हंगामातील उडीद शेतकऱ्यांनी आर्थिक गरज निर्माण झाल्याने तातडीने फेडरेशनला व खासगी व्यापाऱ्यांना त्यावेळी दिल्याने उडीदच कोणाकडे राहिले नाही.
हंगाम संपल्यावर भाव कसा वाढला?
खरीप व रब्बी हंगामातील उत्पादित उडदाची ७ हजार ४०० रुपयापर्यंत शेतकऱ्यांकडून विक्री केली गेली, मात्र दोन्ही हंगाम संपल्यानंतर आता आठ हजार शंभर रुपयांपर्यंत उडदाची खासगी बाजारात खरेदी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यावर जास्तीचा भाव मिळत असल्याचे समोर आले आहे.
खासगी बाजारात उडीद ८ हजार १०० रुपये
- राज्य सरकारकडून काही दिवसांखाली ७,४०० रुपये हमी भावाने उडीद खरेदी करण्यात येत होता.
- त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून उडीद फेडरेशनला देण्यात आला.
- यावेळी उडदाची चाळणी करून फेडरेशनकडून तो स्वीकारला जायचा आणि भाव मात्र कमी द्यायला जायचा.
- मात्र, पर्याय नसल्याने करीने त्यावेळी उडीद फेडरेशनला दिला होता.
- याउलट आता खासगी बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा उडीद ८ हजार १०० रुपयापर्यंत खरेदी केला जाऊ लागला आहे.
उडीदाला शासनाने वेळेतच हमीभाव देणे गरजेचे होते. आता खासगी बाजारात वाढीव भाव मिळत असला, तरी त्याचा थेट शेतकऱ्यांना काही फायदा नाही. व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. - कृष्णा उंडे, रणदिवेवाडी
उडीद हे पीक कमी कालावधीत येते. खरीप व रब्बी हंगामात हे पीक घेण्यात येते. मार्केटिंग फेडरेशनपेक्षा खासगी बाजारात उडदाला कायम जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ओढ आमच्याकडे कायम असते. जिल्ह्यात एक लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उडीदाचे उत्पादन होते. - रवींद्र ठोकडे, व्यापारी, कुर्डूवाडी
सध्या उडदाला भाव चांगला आहे. त्याचा नक्की फायदा होणार आहे, मात्र आता कोणाकडेही उडीद उरला नाही. त्यामुळे शासनाने वेळेतच हमीभाव देण्याचे गरजेचे आहे. - नवनाथ कांबळे, भुताष्टे
अधिक वाचा: 'सीसीआय'ने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी; आणखी वाढू शकतात भाव