मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला.
त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत शुक्रवारी वाशिमच्याबाजार समितीत हळदीचे दर दीड हजारांनी वाढले आहेत.
गत हंगामाच्या सुरुवातीस हळदीला कमाल १९ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले होते. तथापि, त्यानंतर मागणीत घट होत गेल्याने हळदीच्या दरातही घसरण झाली. हळदीचे दर अगदी ११ हजार रुपये प्रती क्विंटलच्याही खाली घसरले. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते.
आता मात्र, मागील आठवड्यापासून हळदीच्या दरात सतत सुधारणा होत आहे. रिसोड बाजार समितीत गत सोमवारी हळदीला कमाल १३ हजार १०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले, तर त्यापूर्वी गत आठवड्यात शुक्रवारी वाशिम बाजार समितीत हळदीला कमाल १२,५०१ रुपये प्रति क्विंटलपर्यतचा दर मिळाला होता.
अशातच शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी वाशिम बाजार समितीत हळदीच्या दराने १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा टप्पा ओलांडला. दिवाळीच्या तोंडावर दरात वाढ झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हळदीचे किमान दर !
हळद कांडी - १२७५०
हळद गट्ट - १०८७०
जिल्ह्यात १५३२२ हेक्टरवर हळदीची लागवड
• कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात ७ हजार ७३७ हेक्टरवर हळदीच्या लागवडीचे नियोजन केले होते.
• प्रत्यक्षात यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांचे क्षेत्र कमी करून नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीवर भर दिला.
• त्यामुळे यंदा तब्बल १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे.
आवकही वाढली
मागील आठवडाभरापासून हळदीचे दर वाढत असतानाच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने शुक्रवारी शेतकऱ्यांनी हळदीच्या विक्रीवर अधिक भर दिला. त्यामुळे वाशिम बाजार समितीत या दिवशी १ हजार ७५० क्विंटल हळदीची आवक झाली होती. त्यापूर्वी सोमवार १२ ऑक्टोबरला रिसोड बाजार समितीत १ हजार ५० क्विंटलचीच आवक झाली होती.
हळदीचे कमाल दर
कान्डी हळद - १४००१
गहू हळद - १२५५०