संजय लव्हाडे
जालना बाजारात सध्या ग्राहकी चांगली असून, जवळपास सर्वच किराणा आणि धान्यमालाच्या दरात तेजी आली आहे. शेंगदाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून तूर, साखर, सोयाबीन आणि खाद्यतेलाचे भावही वधारले आहेत.
सोने-चांदीच्या दरातील तेजीची घोडदौड सुरूच असून, त्याने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दरम्यान, नाफेडने २०२५-२६ या वर्षासाठी तुरीची नोंदणी सुरू केली आहे. शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांची सोने-चांदीला पसंती
जालन्यात सोन्याचे दर १ लाख ५९ हजार रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर ३ लाख ३९ हजार रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. गुरुवारी दरात काहीशी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता; मात्र शुक्रवारी आणि शनिवारी त्यात पुन्हा मोठी वाढ झाली.
तुरीच्या दरात वाढ
• जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक ५,५०० पोते असून, भाव ४,२०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. हंगाम सुरू होण्याआधीच, जानेवारी अखेरीस तुरीच्या दरात अचानक वाढ झाली आहे.
• सध्या तुरीचे भाव ६,४०० ते ८,६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. गेल्या आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
• सरकारने तुरीसाठी ८,००० रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी बाजारात त्यापेक्षा जास्त दर मिळत आहे. जालन्यात तुरीची आवक दररोज १३,००० पोते इतकी होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आहे.
साखरेचा कोटा कमी
पुढील महिन्यात साखरेचा कोटा कमी जाहीर होण्याची शक्यता असल्याने साखर आणखी महाग होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जालना बाजारात साखरेचे दर ४ हजार ५० ते ४ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
जालना बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपयांत)
| धान्य मालदर | किमान-कमाल |
| गहू | २५०० ते ५००० |
| ज्वारी | २१०० ते ५००० |
| बाजरी | २३०० ते ३२०० |
| मका | १३०० ते १७०० |
| तूर | ६४०० ते ८६०० |
| हरभरा | ४८०० ते ५४०० |
| सोयाबीन | ४२०० ते ६००० |
हेही वाचा : दीर्घकाळ ताजे आणि चवदार असणारे होमोजिनाइज्ड दूध कसे तयार होते? जाणून घ्या सविस्तर
