वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्याने शेतकरी निराश आहेत. त्यात आता तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली असून, तुरीचा दर नऊ हजारांखाली आल्याचे सोमवारी बाजार समित्यांच्या लिलावातील आकडेवारीतून दिसले. ऐन हंगामाच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीचे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. खरिपातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून असतात. गतवर्षीपासून तुरीच्या दरात वाढ झाल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी वाढविली.
जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात यंदा तुरीची पेरणी झाली. मागील दोन महिन्यांपूर्वी बाजार समित्यांत १३ हजार रुपये प्रती क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण होते.
आता हंगाम जसजसा जवळ येत आहे. तसतसे तुरीचे दर घसरू लागले आहेत. अशातच सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षाही कमी दर मिळाले. येत्या काही दिवसांत तुरीचा हंगाम सुरू होणार असताना दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
तुरीला कोठे किती कमाल दर?
वाशिम | ८८०० |
कारंजा | ९५१० |
मंगरुळपीर | ८४९० |
मानोरा | ७४०० |
आणखी घसरण होण्याची शक्यता!
सद्यस्थितीत बाजार समित्यांत तुरीची आवक कमी असतानाही दरात घसरण होत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बाजार समित्यांत नव्या तुरीची आवक सुरू होणार आहे. नवी तूर बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढताच तुरीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश