झणझणीत ठेचासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाट भागातून जळगाव बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. दररोज १०० ते १५० किलो मिरचीची आवक होते आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत झणझणीत ठेचा खाणाऱ्या खवय्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे.
दिवाळी काळात लाल ओल्या मिरचीची आवक सुरू होते. नंदुरबारसह छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, अजिंठा भागातून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. सुरुवातीला ४० ते ५० बॅग्ज (प्रतिबॅग १० किलो वजनाची) यायच्या. मात्र, यंदा पावसामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची मिरचीची आवक कमी आहे.
काय आहेत मिरचीचे दर?
जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबारहून येणारी ओल्या लाल मिरचीला जळगाव बाजारात सध्या १२० रुपयांचा (प्रतिकिलो) भाव आहे. मात्र, ही मिरची तेज असल्याने आणि डागाळलेली असल्याने ग्राहक राजस्थानी मिरचीच्या प्रतीक्षेत आहेत.
नोव्हेंबरमध्ये येणार 'राजस्थानी'ची आवक
राजस्थानी मिरची खाण्याला फिकट आणि स्वादिष्ट असते. ठेचासह अन्य खाद्यपदार्थामध्ये या मिरचीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या या मिरचीची आवक सुरू झालेली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आवक सुरू होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
