बार्शी : यावर्षी पावसाने सव्वा महिना गॅप दिल्याने उडदाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यात काढणी सुरू असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने माल डॅमेज झाला.
परिणामी शेतकऱ्याला उत्पादन आणि दरात घसरण असा फटका बसू लागला आहे. यंदा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ ते ८ हजार कट्टे आवक होत आहे.
मात्र ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. असे असताना दर मात्र प्रतिक्विंटल ४ हजारांपासून ७ हजारापर्यंत मिळत आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप मालाची आवक होत असते.
बार्शीचा बाजार भुसार मालाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी दररोज १० ते २० हजार कट्टे असणारी उडदाची आवक यंदा सुरुवातीच्या टप्प्यात १५०० ते २००० कट्ट्यावर आली होती.
आता पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आहे. मध्यंतरी उडीद काढणी सुरू असतानाच पाऊस असल्याने माल डागिल झाला आहे. त्यामुळेही दर कमी झाले आहेत.
दोन टप्प्यांत उडीद पेरणी; आवकही दोन टप्प्यातच
◼️ बार्शी बाजारात भूम, परांडा, करमाळा, वाशी, जामखेड, खर्डा, माढा अन् कुईवाडी आदी भागातील उडीद विक्रीसाठी येतो आहे.
◼️ यावर्षी मे आणि जून आशा दोन टप्प्यात उडीद पेरणी झाली आहे. त्यामुळेच आवक देखील दोन टप्प्यात होणार असे दिसत आहे. सध्या तरी आवक कमी असल्याचे ओंकार गाढवे यांनी सांगितले.
खराब मालामुळे दर कमी
◼️ मागील वर्षी उडदाला ८ हजार ते ८५०० अशा रेंजमध्ये दर मिळत होता. यंदा मात्र सिझनची सुरुवातच कमी दराने झाली आहे.
◼️ साधारणपणे दोन हजार रुपये कमी दर मिळत आहे. पाऊस उघडल्यामुळे आवकही वाढली आहे.
◼️ माल चांगला आला तरच भावही चांगला मिळत असल्याचे व्यापारी विकी ऐनापुरे यांनी सांगितले.
बार्शीत आता ७ ते ८ हजार कट्टे आवक होत आहे. ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत साठ टक्के कमी आहे. उडीदाला माल पाहूनमाल पाहून ४ हजार ते ७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. येणाऱ्या मालात ७० टक्के माल डॅमेज, २० टक्के बरा तर १० टक्केच माल उत्तम प्रतीचा येत आहे. - सचिन मडके, उडीद खरेदीदार
अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर