सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी विक्रमी तब्बल ८३६ ट्रक कांद्याची आवक झाली.
यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामुळे बाजार समिती परिसरात कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
तर आवक अधिक असल्याने बाजार समितीमध्ये कांदा उतरविण्यास वेळ लागला त्यामुळे लिलाव प्रक्रियेला ही उशीर झाला. तसेच कांद्याचे भाव ही घसरले त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे.
यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सातत्याने वाढत चालली आहे.
शनिवारी तब्बल साडेआठशे ट्रक कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे कांदा उतरविण्यास वेळ लागल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचे वजन करण्यास ही विलंब झाला त्यामुळे लिलाव प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते.
अशा परिस्थितीत कांद्याचे दर ही घसरले आहेत. चांगल्या प्रतिच्या कांद्याला प्रति क्विंटल २२०० तर सर्वसाधारण कांद्याला किमान ९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
काद्यांच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल दोन ते अडीच हजाराने घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तब्बल ७ कोटी ५२ लाख ६९ हजारांची उलाढाल
◼️ शनिवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ८३६ ट्रकमधून सुमारे ८३ हजार ६३३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
◼️ त्यामधून तब्बल ७ कोटी ५२ लाख ६९ हजार रुपयांची उलाढाल कांदा बाजारात झाली होती.
कांदा उतरविण्यास आणि काटा करण्यास विलंब
◼️ रविववारी शासकीय सुट्टी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्याने शनिवारी कांद्याची मोठी आवक झाली होती.
◼️ त्यामुळे कांदा घेऊन आलेल्या वाहनाच्या रांगा बाजार समितीच्या बाहेर ही लागल्या होत्या.
◼️ आलेला कांदा उतरविण्यास आणि त्यांचे वजन करण्यास वेळ लागल्याने लिलाव प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
अधिक वाचा: परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावातील 'या' शेतकऱ्याला यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर; जाणून घ्या सविस्तर
