सर्वात मोठ्या आणि गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये मुंबईआंबा कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) चा समावेश होतो. ४५ देशांमध्ये भारतातून जितका आंबा निर्यात होतो, त्यापेक्षा जास्त आंब्यांची विक्री या बाजार समितीत होते.
यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी सुमारे ५०० कोटींच्या उलाढालीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई एपीएमसीला यंदा ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्या आधीपासूनच मुंबईत अनेक कुटुंबे वंशपरंपरेने आंबा व्यापारात आहेत.
आज अनेक व्यापाऱ्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मुंबई एपीएमसीची ओळख आंबा व्यापाराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक अशी आहे.
केवळ भारतातीलच नव्हे, तर मलावीसारख्या देशांतील आंबेही येथे येतात. याच बाजारातून मुंबई, नवी मुंबई, तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत आंब्यांचे वितरण केले जाते. याशिवाय येथूनच मोठ्या प्रमाणावर निर्यातही केली जाते.
आंबा हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी बाजार समितीकडून विशेष नियोजन केले जाते. आंब्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून वाहतूक कोंडीत फळांची नासाडी होऊ नये.
निर्यात भवनामध्ये अत्याधुनिक 'रायपनिंग चेम्बर'ची सुविधा आहे. तेथे आंबा नियंत्रित पद्धतीने पिकविण्याची सोय आहे. निर्यातीसाठी जवळच असलेले जेएनपीए बंदर आणि मुंबई विमानतळ, यामुळे व्यापाराला मोठी गती मिळते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने विकिरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने निर्यात प्रक्रियाही सुलभ झाली आहे. या सर्व सुविधांमुळे मुंबईतील आंबा व्यापाराचा विस्तार सातत्याने होत आहे.
यंदा कोकण आणि दक्षिणेकडील राज्यांत आंबा उत्पादन कमी झाले असले, तरी सध्या दररोज सुमारे ४०० टन आंब्याची आवक बाजार समितीत होत आहे.
एप्रिलअखेरपर्यंत ही आवक वाढून दररोज १,००० टनांहून अधिक होण्याची शक्यता आहे. सध्या कोकणातून हापूसची आवक सुरू झाली आहे.
याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथून हापूससदृश आंबा, बदामी आणि तोतापुरी आंबेही विक्रीसाठी येत आहेत. चालू महिन्यात गुजरातमधूनही आंब्यांची आवक होईल. जूनपासून उत्तर प्रदेशमधील आंबेही मुंबईच्या बाजारात येतील.
यंदा गुजरातमध्ये आंब्याचे उत्पादन चांगले असल्याने २८ एप्रिलपासून तेथील हापूससदृश आंबा, केसर आणि राजापुरी प्रजातींची आवक सुरू होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कच्छ भागातून केसर आंबा बाजारात येईल.
२० एप्रिलपासून आवक वाढणार
यंदा हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. सुमारे २० टक्केच उत्पादन झाल्याचे सांगितले जाते. मात्र, २० एप्रिल ते १० मे दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून हापूसची आवक वाढण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये जुन्नर हापूस
कोकणातील हंगाम संपताच जूनमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हापूस बाजारात दाखल होतो. या आंब्यालाही ग्राहकांकडून चांगली पसंती मिळते.
- नामदेव मोरे
उपमुख्य उपसंपादक
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
