आरोग्यासाठी लाभदायक व कोलेस्ट्रॉल कमी करणारे म्हणून करडईचे तेल ओळखले जाते. करडई लागवड शेतकरी करत नसले तरी आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे तेलाचे दर मात्र वाढले आहेत.
शुद्ध करडईचे तेल ३८० ते ३९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे, तर काही ठिकाणी ४०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत करडई तेलाच्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
मात्र, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे करडई तेलाचा वापर मोजकीच मंडळी करत असल्याने खपही मर्यादित असून, करडईच्या घाण्यावरील तेलाचे दर आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
करडईच्या तेलाचा भाव गगनाला भिडला
करडईच्या तेलाने यावर्षी विक्रमी दर गाठले आहेत. सध्या बाजारात घाण्यावरील तेल ३८० ते ३९० रुपये, तर किरकोळ बाजारातील हा दर ४०० रुपयांच्या पुढे गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सहा महिन्यांत १०० रुपये किलोने वाढला भाव
करडई उत्पादनात घट झाली असून, बाजारातील कमी उपलब्धतेमुळे दरात वाढ झाली आहे. सहा महिन्यांत करडईचे तेल १०० रुपयांनी वाढले आहेत. एप्रिलमध्ये २८० रुपये किलो दर होते.
करडईचे तेल इतके महाग का?
करडई उत्पादनात घट मात्र शुद्ध, कोल्ड प्रेस्ड तेलासाठी वाढती मागणी असून, पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत.
आरोग्यासाठी करडईचे तेल लाभदायक
या तेलात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यातील ओमेगा-६ फॅटी अॅसिड रक्तातील चरबी करते.
करडईचा पेरा कमी का?
करडई हे दुष्काळी परिस्थितीत टिकणारे तेलबिया पीक आहे. राज्यात दिवसेंदिवस करडई पिकाचा पेरा कमी होत चालला आहे.
