अनिलकुमार मेहेत्रे
मोसंबीचे माहेरघर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील पाचोड परिसराला यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा जबर फटका बसला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी व व्यापारीही संकटात सापडले आहेत.
पाचोडच्या बाजारपेठेत, गत वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोसंबीला तब्बल ५० हजार रुपये प्रतिटनाचा भाव आत्तापर्यंत मिळत होता; या वर्षी हा दर अवघ्या २ ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. कारण सलग पाऊस पडल्याने मोसंबी बागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे फळांचा रंग, आकार व चव बिघडली.
अनेक बागांतील फळे सडली, वजन कमी झाले. दिल्ली, नागपूर, मुंबई या बाह्य बाजारांत थंडीचा जोर असल्याने पाचोडच्या मोसंबीला उठावच नाही. 'गुणवत्ता घसरल्याने मागणीही घटली. त्यामुळे दर कमालीचे कोसळले आहेत, असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात भाव मिळत नसल्याने काही शेतकरी संतापाने मोसंबीची झाडे तोडत आहेत.
वर्षानुवर्ष जपलेल्या बागा एका हंगामात उद्ध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पाचोडची बाजारपेठ यंदा ठप्प झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी-व्यापारी दोघेही जबर आर्थिक कोंडीत असून, शासनाने नुकसानभरपाई व विमा या दोन्ही माध्यमांतून तातडीने मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
व्यापाऱ्यांची आगाऊ रक्कम फसली
पाचोड येथे खरेदीसाठी मुंबई, आंध्र, बिहार, दिल्ली, कोलकाता, आदी राज्यांतून व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनी दिवाळीआधीच आंबा बहार मोसंबीसाठी सौदे करून आगाऊ रक्कम दिली होती; पण आता निकृष्ट मोसंबीमुळे तोडणीच नाकारली जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांचीही अडचण वाढली आहे.
बाजारात मागणी नसल्याने दर कोसळले
मुसळधार पावसामुळे, दिल्ली, नागपूरमधील थंडी आणि निकृष्ट फळामुळे मार्केटच उद्ध्वस्त झाले. मागणी नाही म्हणून दर कोसळले आहेत. - शिवाजी भालसिंगे, व्यापारी, पाचोड.
